

महाड : श्रीकृष्ण बाळ
महाड-भोर-पंढरपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे मात्र पुणे जिल्ह्यातील भोरपासून या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने भोर मार्गे पंढरपूरच्या कार्तिकी वारीला जाणाऱ्या पायी दिंडीच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर नाहक चिखलातून प्रवास करावा लागल्याचे विदारक चित्र या घाटात पाहण्यास मिळत आहे.
महाड भोर पंढरपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रायगड जिल्ह्याच्या हद्दीत तसेच पुणे जिल्ह्याचे हद्दीत चालू आहे. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्यापासून वरंधपर्यंत या राष्ट्राच्या काँक्रीट करण्याचे काम बहुतांशी पणे प्रगतीपथावर आहे मात्र पुणे जिल्ह्यातील भोर पासून ते वाघजाई मंदिरापर्यंत या रस्त्याच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत.
महाड-भोर-पंढरपूर रस्त्यावर भोर घाटात चौपदरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निरादेवदर धरणाच्या बाजूला असणाऱ्या डोंगराच्या टेकड्या फोडण्याचे काम मागील दोन वर्षापासून चालू असल्याने हा रस्ता अवजड वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. यामुळे मागील दोन वर्षापासून भोर मार्गे पुणे व पंढरपूर कडे जाणारी वाहतूक ही वाई महाबळेश्वर मार्गे किंवा माणगाव ताम्हणी घाटातून चालू आहे. या भोर घाटातील चौपदरीकरणाचे काम चालू झाल्याने व मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या रस्त्यामुळे कोकणातील महाड, खेड, दापोली, मंडणगड या परिसरात तील व्यापाऱ्यांच्या येणारा किराणा माल तसेच भाजीपाला वाहतूक होत नसल्याने अनेक व्यापाऱ्यांना या भोरच्या बंद रस्त्याचा फटका बसला आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी महाड शासकीय विश्रामगृहात त महाड भोर पंढरपूर रस्त्याच्या सद्य परिस्थितीबाबत गणेश उत्सव काळापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून हा महामार्ग गणपतीपूर्वी सुस्थितीत दोन्ही बाजूकडून करावा तशाच सूचना दिल्या होत्या व याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून सूचना दिल्या होत्या तेव्हा हा रस्ता गणेशोत्सव काळा चालू होईल अशी अपेक्षा कोकणात पुण्यातून येणाऱ्या चाकरमान्यांनी व्यक्त केली होती. मात्र खासदार सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचनेचे पालन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना करता आले नाही अशी चर्चा महाड भोर पंढरपूर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विठ्ठल दर्शनासाठी कार्तिकी वारीला पायी जाणाऱ्या दिंडी मधील वारकऱ्यांकडून विचारला गेला आहे.
भाविकांचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सवाल
महाड-भोर-पंढरपूर रस्ता गणपती गेले, दसरा गेला, दिवाळी गेली. आता नेमका कधी चालू करणार असा प्रश्न पंढरपूरच्या कार्तिकी वारीला पायी जाणाऱ्या दिंडी मधल्या हजारो भाविकांनी आज कार्तिकी वारीला जाणाऱ्या गाड्या भोर घाटातील चिखलात रुतल्यानंतर जो मनस्ताप केला त्यातून हा प्रश्न रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.