

महाड (रायगड) : जून 2024 मध्ये शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महाड तालुक्यात आत्ता पावतो 74 हजार लाभार्थींना या योजनेचा फायदा झाला आहे. या योजनेच्या निकषांमध्ये न बसलेल्या व निदर्शनास आलेल्या बहिणींसंदर्भात अंगणवाडी सेविकांकडून सर्वे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात महाड पंचायत समिती मधील आयसीडीएस विभागातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जून 24 पासून 74 हजार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ झाला आहे मात्र एका कुटुंबात एकापेक्षा जास्त असणार्या तसेच 21 ते 65 वयात असणार्यांच्या संख्येची माहिती उपलब्ध झाली आहे. अंगणवाडी सेविकांकडून सर्वे सुरू झाला असून या महिनाअखेरपर्यंत या संदर्भात सविस्तर अहवाल प्राप्त होईल असे सांगण्यात आले आहे.
राज्यात सध्या या योजनेअंतर्गत अपात्र असणार्या लाडकी बहिणींची आकडेवारी समोर आल्यावर या संदर्भात महाड तालुक्यातील तीन हजारपेक्षा जास्त महिलांवर या अपात्रते अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत या संदर्भातील अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच महाड तालुक्यात एकूण 3 हजारपेक्षा जास्त असलेल्या या निकषातील लाडक्या बहिणी संदर्भात निर्णय घेतला जाईल असे या कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वेगवेगळया कारणांमुळे चर्चेत आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या योजना सध्या वादाच्या भोवरयात सापडली आहे. रायगड जिल्हयात या योजनेच्या पावणेसहा लाख लाभार्थी आहेत. मात्र यातील 60 हजार लाडक्या बहीणींवर अपात्रतेची टागंती तलवार आहे. सध्या फेरतपासणी सुरू आहे, त्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.