

तळा : संध्या पिंगळे
महामार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्गाच्या बळावर कोकण आज विकासाच्या नव्या टप्प्यावर उभा आहे. निसर्गसंपन्न कोकणाच्या प्रगतीला कोणत्याही प्रकारे ब्रेक लागू देणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला. पर्यटनासोबतच औद्योगिक विकाससाधत कोकणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा निर्धार त्यांनी तळा न.पं. नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमीपुजना प्रसंग केला.
नागरी सेवा व सुविधा योजनेंतर्गत तळा न.पं.च्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा सोमवार ता. 5 जानेवारी रोजी खा. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळा येथे पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, ॲड. उत्तम जाधव, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भौड, महिला तालुका अध्यक्ष जान्हवी शिंदे, माजी समाजकल्याण सभापती गीता जाधव, माजी सभापती अक्षरा कदम, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेखरशेठ देशमुख, शादाबभाई गैबी, सरपंच, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
तळा न.पं.च्या इमारतीसाठी 4 कोटी रुपये तत्काळ मंजूर करण्यात आल्याची घोषणा करत, उर्वरित 4 कोटी रुपये येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून एकूण 8 कोटींचा निधी पूर्ण केला जाईल, तसेच न.पं. इमारत बांधकामासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही याची त्यांनी ग्वाही त्यांनी दिली. काम दर्जेदार झाले पाहिजे आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे. हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा थेट इशारा देत अजित पवार यांनी संबंधित ठेकेदार व यंत्रणांना जबाबदारीची जाणीव करून दिली. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असताना शासनाने त्यांना मदतीचा हात दिला. मात्र, कोकणातील काजू, आंबा आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांनाही अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट करत कोकणालाही विकासात समान न्याय मिळेल, अशी भूमिका मांडली.
कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. या निसर्गावर कोणताही आघात न करता प्रदूषणविरहित उद्योग, रोजगार निर्मिती आणि पर्यटनवृद्धी साधली जाईल. स्थानिकांना रोजगार देऊन स्थलांतर थांबवण्यासाठी तळा परिसरात विशेष प्रकल्प राबवले जातील, असा ठाम निर्धार व्यक्त केला. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान आणि एआय शिक्षणाशिवाय विकास अपूर्ण आहे, असे सांगत अजित पवार यांनी रोहा येथे टाटा कंपनी व राज्य सरकारच्या सहकार्याने सी-ट्रिपल आयटी शिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. याच वेळी श्री चंडिका देवी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच पक्षीदिनाच्या निमित्ताने निसर्ग व पक्ष्यांचे संवर्धन ही काळाची गरज सांगत पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश दिला. खासदार सुनील तटकरे यांनी तळा तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने विकासकामे आणली जात असून, अजित पवार यांचे मजबूत पाठबळ कायम असल्याचे स्पष्ट केले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही तळा तालुक्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेहमीच झुकते माप राहिले असल्याचे ठामपणे सांगितले. केंद्रातील सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व सहकारी यांच्या एकत्रित ताकदीने महाराष्ट्र देशात नंबर वन राज्य बनवण्याचा निर्धार असून, तळा आणि कोकणाचा विकास हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे, असेही ना. अजित पवार यांनी स्पष्ट केले.