

पोलादपूर: कोकणात पावसाळ्याच्या आधी सामानाची बेगमी करण्याची रीत अनेक वर्षांपासून आहे. आजही तंत्रज्ञानाच्या युगात मुख्य ग्रामीण भागात अगोटचे साहित्य भरण्यात येत आहे. कडधान्य सह इतर डाळी, पापड,कुरड्या आदी साहित्य उन्हाळच्या दिवसात खरेदी करत ते कडक उन्हात ठेवत असत त्याला वाळवणे म्हणतात बदलत्या काळात साहित्य रोजच मिळत असल्याने शहरात या संस्कृतीचे प्रकार कमी दिसत असले तरी ग्रामीण भागात आजही वाळवण पद्धती टिकून आहे किंवा जपली जात आहे.
गावातील महिला एकत्र येत ज्या घरात पापड बनवायचे आहेत, त्या ठिकाणी मदतीसाठी येत असतात.उन्हाळा म्हटला की गावोगावीच्या घराघरांमध्ये वाळवणाच्या पदार्थाचा घाट घातला जायचा. त्यात पापड, कुरड्या, वडे, मिरच्या, शेवया, फणसाचे गरे अशा विविध पदार्थाचा समावेश असायचा. हे पदार्थ वर्षभराची बेगमी असायचे. आणि या बेगमीसाठी घरातल्या महिला तर झटायच्याच. पण त्यात मुलांचाही समावेश असायचा. संपूर्ण घरच जणू काही या बेगमीच्या तयारीला लागलेलं असायचं.
कित्येकांच्या घरी उन्हाळ्यात वाळवणाचा कार्यक्रमाचा बेत आखला जातो. गावाकडून मुंबईला स्थायिक झालेल्या बायकादेखील वर्षभराच्या बेगमीसाठी दरवर्षी आठवडाभराची रजाही घेतात. उन्हाचे चटके बसू नयेत किंवा वाळवणाला चांगलं ऊन मिळावं म्हणून हे सगळे पदार्थ सकाळी लवकर उठून केले जातात. कारण ऊन वाढलं की पायाला चटके बसतात. मग ते वाळवणं घालायला त्रास होतो. शिवाय उशिरा वाळवण घातलं की मग त्यांना ऊनही कमी लागतं. मग अंगण, गच्ची आदी कुठेही जिथे वाळवणं घालायची तिथली जागा स्वच्छ केली जाते.
एखादं प्लास्टिकचं भलं मोठं कापड टाकलं जातं. आणि ते उडू नये म्हणून त्याच्या कोपऱ्यावर विटा किंवा दगड ठेवले जातात आणि मग एक दिवस नागलीचे पापड, दुसऱ्या दिवशी नाचणीचे, नंतर उडदाचे पापड, मग साबुदाण्याच्या पापडया आणि चकल्या, वगैरे..उन्हाळी वाळवण हि पुढच्या वर्षभरासाठी केली जाणारी बेगमी म्हणजे साठवणूक असते. महिलांनी आजही पद्धत जपून ठेवलीय. आपली खाद्यसंस्कृती इतक्या विविध खाद्यप्रकारांनी आणि खाद्यपदार्थांनी समृद्ध आहे. त्यात वाळवणाला वेगळं महत्व आहे.
शहरी भागातील अंगणे कमी झाली आहेत त्यातच अनेक महिला रोजच्या लागेल तेवढेच साहित्य खरेदी करत असल्याने साठविण्याची प्रश्न नसल्याने व पापड तयार विकत आणत असल्याने वाळवण संस्कृती शहरात दिसून येत नाही मात्र ग्रामीण भागात ती आजही रुजत असल्याचे पाहवायस मिळत आहे.
शहरातवाळवणं करताना गच्ची, गॅलरीचा आधार
यावेळी वर्षभरात येणाऱ्या उपवासाकरिताही साबुदाणा फेण्या बनविल्या जातात. कारण या काळात ते वाळतात चांगले आणि वर्षभर टिकतातही चांगले. खासकरून ग्रामीण भागात ऐसपैस अंगणात वाळत घातलेली पापड कुरडयांची वाळवणं म्हणजे अंगणीची शान वाढविणारी ठरतात. अंगणातील ही वाळवणं आणि त्याच्या देखरेखीसाठी बसलेली लहान मुलं, म्हातारी आजी किंवा घरातील माणसं ही वाळवणं अगदी डोळय़ांत तेल घालून देखरेख करत आहेत. अन्यथा प्राणी, पक्षी त्याचा समाचार घेण्यासही काहीसे सज्ज झालेले असतात. तर शहरी भागातही ही वाळवणं करताना गच्ची, गॅलरीचा आधार घेतला जातो. हा पदार्थ जेवणात लज्जत आणणारा ठरतो.