

पोलादपूर : संपूर्ण भारतभर होळी साजरी केली जाते, पण कोकणात हा सण शिमगोत्सवाच्या रूपाने अधिक भव्य आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ग्रामदेवतेच्या पालख्या, होळी पूजन, संकासुर वध, लोककला आणि पारंपरिक जल्लोष यामुळे शिमगा हा कोकणातील सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक सण मानला जातो. शिमगा हा केवळ एक सण नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचा, परंपरांचा आणि भक्तीभावाचा उत्सव आहे तो पुरातन काळापासून जपला जात आहे.
कोकणातील शिमगोत्सव हा गावाच्या संस्कृतीशी, शेतीशी आणि ग्रामदैवताशी निगडीत असलेला सण आहे . गावागावांमध्ये पालख्यांची मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, नृत्य, दशावतार नाट्यप्रयोग आणि विविध धार्मिक विधी पार पडतात. होलिकादहन, गावदेवतेची मिरवणूक आणि रंगपंचमीपर्यंत चालणारे विविध उत्सव यामुळे हा सण आठवडाभर साजरा केला जातो.
शिमगा हा कोकणातील एक परंपरागत लोकउत्सव आहे, जो फाल्गुन महिन्यात (मार्चच्या सुमारास) होळीच्या सणाच्या आसपास साजरा केला जातो. हा उत्सव साधारणतः पाच ते सात दिवस चालतो आणि कोकणातील लोकसंस्कृती, परंपरा आणि भक्तीभावाचे दर्शन घडवतो.
कोकणात होळीच्या सणाला एक वेगळाच रंग असतो. होळीच्या दिवशी पहाटे ग्रामस्थ एकत्र येऊन होलिकादहन करतात. त्यानंतर जवळजवळ आठवडाभर गावोगावी पालखीचा उत्सव साजरा करण्यात येतो. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते.
या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं. घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. हा उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातील पाहुणेमंडळी देखील
कोकणात येतात. कारण पालखी नाचवताना पाहणे हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो. यासाठी अनुभवी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात. गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात. यावेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात असं म्हटलं जातं. यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण-नारळ बदलण्यात येतात. कोकणवासियांसाठी हा क्षण अविस्मरणीय असतो.
पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. त्यामुळे पालखी नाचवताना पाहण्यासाठी प्रत्येक गावचे ग्रामस्थ इतर गावांमध्येदेखील जातात. काही ठिकाणी या निमित्ताने दशावतार, सिनेमा, भजन-कीर्तन अशा मनोरंजक गोष्टींचे आयोजन केले जाते. ग्रामदेवता म्हणजे गावाचे रक्षण करणारी देवता. प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता असते. ग्रामदेवता ही संपूर्ण गावाचे दैवत असते. ग्रामदेवता गावाचे रोगराई, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या संकटांपासून रक्षण करते, असा समज आहे. पालखी म्हणजे ग्रामदेवतेची मूर्ती ठेवण्यासाठी तयार केलेली एक विशेष प्रकारची बैठक. शिमगा सणाच्या काळात ग्रामदेवतेची पालखी गावातून फिरवली जाते.
ग्रामदेवतांची पालखी हा महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील एक महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवात ग्रामदेवतेची मूर्ती पालखीतून गावातून फिरवली जाते, ज्यामुळे ग्रामस्थांना देवतेचे दर्शन घेण्याची संधी मिळते.