

रायगड: कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये २८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विज्ञान विभाग (ग्रामीण कृषि मौसम सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व पशुपालकांसाठी विशेष कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे भात रोपवाटिकेमध्ये पाणी साचून रोपे पिवळी पडणे किंवा मुळांची वाढ खुंटण्याची शक्यता असल्याने रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा तात्काळ करावा. तसेच नव्याने पुनर्लागवड केलेल्या भात खाचरांमध्ये २.५ ते ५ सें.मी. पाण्याची पातळी कायम ठेवून अतिरिक्त पाणी बाहेर काढून द्यावे. भुईमूग व कारळा शेतात पाणी साचून झाडे कोमेजणे व मर रोग होण्याचा धोका असल्याने पाण्याचा त्वरित निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
आंबा, काजू, नारळ व सुपारीच्या बागांमध्ये पावसामुळे बुरशीनाशके किंवा कीटकनाशके धुवून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे किमान ३ ते ४ तास पावसाची उघडीप मिळाल्यास आणि पावसाची तीव्रता कमी असतानाच स्टिकरचा (चिकटणारा पदार्थ) वापर करून फवारणी करावी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवीन लागवड केलेली आंबा, काजू, नारळ व सुपारीची रोपे किंवा कलमे तुटून नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठ्यांचा भक्कम आधार द्यावा.
जनावरांमध्ये भीती व ताण निर्माण होऊ शकतो तसेच विजा पडण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पशूंना झाडांखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात किंवा शेडमध्ये ठेवावे. तसेच कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून ठेवून पक्ष्यांचे पावसापासून वाऱ्यापासून संरक्षण करावे.