

खोपोली : प्रशांत गोपाळे
तीन चार वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीची तारीख 6 ऑक्टोबर तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होते यामुळे हौशे, नवशे इच्छुक उमेदवार धास्तावले असून आपल्यासाठीच आरक्षण निघावे यासाठी देव पाण्यात बुडवले असल्याची चर्चा सुरू आहे.
मागील महिन्यांपूर्वी खोपोली नगर परिषदेच्या एकूण 15 प्रभाग रचना झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, भाजपा, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट अन्य पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दीही झाली. इच्छुक व पक्षाकडून उमेदवारी मिळणार्या अनेकांनी आपल्या प्रभागात जनसंपर्कही सुरू केला. विविध उत्सव व सणानिमित्त संभाव्य उमेदवारांचे मोठमोठे पोस्टर व बॅनरही शहरात झळकत आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसुद्धा केली आहे. कोेणत्या पक्षाकडून कोण उभा राहणार? याबाबतची चर्चाही शहरात रंगत आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपापल्या पक्षातील इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांची कमान सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार देण्यावर प्रमुख राजकीय पक्षाचा भर राहणार आहे. खोपोली नगर परिषदेची पुढे होणारी ही निवडणूक चार पाच वर्षानी होत असल्याने या निवडणुकीचे इतिहासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व राहणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य तर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जास्त मताधिक्य मिळाल्याने आमदार निवडून आले आहेत. दोन्हीही निवडणुकीत मतदानाचे समीकरण वेगळे असल्याने विविध अंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.