

महाड : श्रीकृष्ण बाळ
औद्योगिक वसाहतीच्या तीन दशकांनंतर मुख्य रस्त्याचे काम सध्या संत गतीने सुरू असल्याने औद्योगिक वसाहतीमध्ये येणार्या कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनाही याचा मनस्ताप होत आहे. दरम्यान औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची ही दुरवस्था झाल्याचे चित्र प्रत्यक्ष भेटी दरम्यान निदर्शनास आले.
मागील तीन वर्षांपूर्वी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन समारंभ दणक्यात संपन्न झाला होता त्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हा मार्ग पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते मात्र आज तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील निम्म्यापेक्षा जास्त काम अपूर्णच असल्याचे दिसून आले आहे.
या रस्त्यालगत बांधण्यात येणारा संरक्षक कठडा जवळ असलेले लोखंडी खांब अपघाताला निमंत्रण देणारे ठरणार असल्याच्या तक्रारी वारंवार करून देखील औद्योगिक विकास महामंडळाच्या बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.
मुख्य रस्त्याच्या कामाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाच अंतर्गत रस्त्यांची मात्र पूर्तता हा दुरवस्था झाली आहे सध्या प्रगतीपथावर असलेला रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा असल्याने अंतर्गत रस्ते देखील पुढील काळात सिमेंट काँक्रीटचे करावे लागतील हे लक्षात घेता आगामी किती काळात या सर्व वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची पूर्तता होईल, असा प्रश्न कामगार वर्गासह स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
तीन वर्षांपूर्वी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या मार्गावरील पथदिवे बंद करण्यात आले आहेत यामुळे या मुख्य मार्गावर रात्री असलेल्या अंधाराचा फटका देखील अनेक वेळा नादुरुस्त रस्त्यांमुळे कामगार वर्गासह नागरिकांना सहन करावा लागला आहे.
जेबीएफ फाटा ते सेंचुरी मार्गावरील, फायर स्टेशनपासून अंतर्गत रस्ता, कुजगाव फाटा, विनती कंपनीकडे जाणारा मार्ग या मार्गाची पूर्ती दुरावस्था झाली असून येथून मुसळधार पावसाच्या वेळी दुचाकी गाड्यांना जाण्यासाठी देखील त्रास सहन करावा लागत आहे. योग्य पद्धतीने झाले सफाई झाली नसल्याने रस्त्यावर साचणार्या पाण्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
यासंदर्भात संबंधित अधिकार्यांकडे विचारणा केली असता सुरू असलेला पाऊस संपल्यानंतर गतीने कामे पूर्ण होतील असे स्पष्ट करण्यात आले असले तरीही सद्यस्थितीमध्ये कामाची असलेली गती लक्षात घेता अजून किमान सहा महिने या रस्त्याच्या पूर्ततेसाठी लागतील, अशी शक्यता कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.
एकीकडे महाड औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन कारखान्यांकरता शासनाकडे प्रस्ताव दिले जात असतानाच मुख्य मार्गाच्या नादुरुस्तीला सामोरे जावे लागत आहे. या नवीन येणार्या कंपनीतील व्यवस्थापनाला यामुळे आगामी काळात अधिक किती समस्यांना सामोरे जावे लागेल असे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच झालेला विलंब लक्षात घेता औद्योगिक विकास महामंडळाने या संदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी संबंधित ठेकेदारा ला सूचना द्याव्यात अशी मागणी कामगार वर्गसह परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.