

रायगड : महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. भारत सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘आदि कर्मयोगी अभियानांतर्गत’ जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 113 आदिवासी गावांच्या ग्राम विकास आराखड्यांना (व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन)विशेष ग्रामसभांमध्ये मंजुरी देण्यात आली.
या विकास आराखड्यांनुसार सन 2030 पर्यंत गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘आदि सेवा पर्व अभियान’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
या दरम्यान आदि कर्मयोगी स्वयंसेवकांनी सर्व विभागीय अधिकार्यांच्या सहकार्याने प्रत्येक आदिवासी वाड्याला भेट देत शिबिर फेर्या आयोजित केल्या. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण यांसंबंधी अडचणींची तपासणी करून ग्रामनिहाय माहिती संकलित करण्यात आली. या माहितीच्या आधारे संबंधित गावांचे विकास आराखडे तयार करण्यात आले.
‘विकसित भारत’ संकल्पनेला चालना मिळणार
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सर्वानुमते पुढील 5 वर्षांसाठी विकास कामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आदिवासी वाड्यांच्या विकासाला गती मिळणार असून, मूलभूत सुविधा व विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे ‘विकसित भारत’ या संकल्पनेला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला आहे.