

श्रीवर्धन: भारत चोगले
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्ग व समुद्रकिनाऱ्यावर दिसून येणाऱ्या भग्नावस्थेतील देव-देवतांच्या मूर्ती भग्र स्वरुपात पडून आहेत. या मूर्तीचे योग्य प्रकारे संवर्धन करुन चांगले संग्रहालय उभारले जावे, अशी मागणी भाविकातून केली जात आहे.
हरिहरेश्वर आणि दिवेआगर ही रायगड जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक-पर्यटन स्थळे मानली जातात पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि धार्मिक संवर्धनाच्या मुद्द्यांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर विविध देव-देवतांच्या मूर्ती तुटलेल्या, भग्न अवस्थेत आणि अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून येतात. ड जिल्ह्यातील अनेक प्राचीन मंदिरे काळानुसार जीर्णोद्धारासाठी घेतली जातात. काही ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती कालांतराने झिजलेल्या किंवा खराब झालेल्या असतात.
धार्मिक परंपरेनुसार अशा मूर्ती हरिहरेश्वरसारख्या पवित्र स्थळी समुद्रात विसर्जित केल्या जातात. या विसर्जनामुळे मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. मात्र समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे या मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर येतात आणि कालांतराने त्या भग्न अवस्थेत उघड्यावर पडून राहतात. ही शिल्पे केवळ दगड नसून श्रद्धेची, इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष आहेत, असे मत अनेक जाणकार नागरिक आणि पर्यटकांनी मांडले.
दक्षिण काशी हरिहरेश्वर हे केवळ तीर्थक्षेत्र नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर, श्रद्धा, कायदा आणि पर्यावरण यांचा समतोल साधत योग्य निर्णय घेण्याची गरज आता अधिक तीव्रपणे जाणवू लागली आहे. संबंधित प्रशासन, धार्मिक ट्रस्ट आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहेत.
शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करा
या पार्श्वभूमीवर, भग्न अवस्थेतील मूर्तीचे शास्त्रशुद्ध जतन व संवर्धन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. समुद्रकिनाऱ्यावर किंवा प्रदक्षिणा मार्गावर उघड्यावर पडलेल्या मूर्ती एकत्र करून त्यांचे स्वतंत्र संग्रहालय किंवा दर्शन केंद्र उभारावे, अशी ठाम अपेक्षा भाविक आणि पर्यटक व्यक्त करीत आहेत. यामुळे मूर्तीचा सन्मान राखला जाईल, भाविकांना दर्शनाची सुविधा मिळेल आणि हरिहरेश्वरच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे जतनही होईल.