Raigad News : खारपाडा टोल नाक्यावर पुन्हा टोलवसुली?

वाहनचालकांमध्ये संभ्रम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चौकशीची मागणी
Kharpada Toll Collection Controversy
Kharpada Toll Collection Controversypudhari photo
Published on: 
Updated on: 

माणगाव : अरुण पवार

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाचा असलेल्या खारपाडा टोल प्लाझावरील टोलवसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासनाने टोलवसुली बंद केल्याचे सांगितले जात असताना, वाहनचालकांकडून अद्याप शुल्क आकारले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष साज्जाद दावरे यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला जात असताना साज्जादभाई दावरे यांना खारपाडा टोल नाक्यावर शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी टोलवसुलीबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी जयेश नामक कर्मचाऱ्याने कथितरीत्या उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप दावरे यांनी केला. कोणत्याही व्हीआयपीला टोलमधून सूट नसून सर्वांकडून शुल्क आकारले जाते, असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले.

Kharpada Toll Collection Controversy
Ex Navy Agniveers Join Police Force : ७२० किमीच्या किनारपट्टीच्या सुरक्षेला भक्कम आधार

या शासनाच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. टोलवसुली बंद करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात असेल, तर त्यानंतरही वाहनचालकांकडून पैसे का घेतले जात आहेत? संबंधित टोल प्रशासनाला शासनाच्या निर्णयाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत का? असे प्रश्न दावरे यांनी उपस्थित केले आहेत.

टोलवसुलीच्या निर्णयाबाबत संभ्रम कायम राहिल्यास त्याचा थेट आर्थिक भार सर्वसामान्य वाहनचालकांवर पडू शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने केवळ तोंडी स्पष्टीकरण न देता शासनाच्या आदेशाची स्थिती, टोलवसुलीचे अधिकृत नियम आणि शुल्क आकारण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी दावरे यांनी केली आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या कथित अरेरावीच्या वर्तनाचीही चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, टोलवसुली बंद करण्याच्या निर्णयानंतर ती पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आपल्या निदर्शनास आलेली नसल्याचे दावरे यांनी सांगितले आहे. मात्र, या प्रकरणातील शासनाचा नेमका आदेश आणि टोल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट होणे आवश्यक आहे.

Kharpada Toll Collection Controversy
Thane Crime : उंबर्डे मारहाण प्रकरणात दोघांना अटक; मुख्य आरोपीला अटक केव्हा?

आंदोलनाचा इशारा!

खारपाडा टोल प्लाझावरील टोलवसुलीबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. निर्णयानंतरही अनधिकृतपणे शुल्क आकारले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी साज्जाद दावरे यांनी केली. या प्रश्नावर तातडीने योग्य निर्णय न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news