

पनवेल ःखारघर व तळोजा क्षेत्रातील सिडकोनिर्मित गृहनिर्माण संकुल असलेल्या आसावरी, बागेश्री, केदार, मारवा, धनश्री व इतर गृहसंकुलांतील पदाधिकारी व रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीच्या अनुषंगाने या गृहनिर्माण सोसायटींचे रजिस्ट्रेशन, सुरक्षा, पाणी, स्वच्छता, वीज या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला नितीन भोईर, खांडू खटरमल, संदीप वेथेकर, नवनाथ भोजने व इतर सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सिडकोतर्फे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्या अंतर्गत अभियांत्रिकी इस्टेट, पाणी व अन्य अधिकारी यांची कमिटी करून त्यांनी पंधरा दिवसाच्या आत या सर्व सोसायटीमध्ये जाऊन प्रत्यक्षात निरीक्षण करून सकारात्मक तोडगा काढण्यासंर्दभात तातडीने कार्यवाही करण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. ती सूचना तातडीने मान्य करून सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी कार्यवाही करण्याचे मान्य केले व संकुलातील रहिवाशांचे समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासित केले.
रजिस्ट्रेशनच्या बाबतीत सोसायटीने कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी मान्य केले. या फलदायी बैठकीमुळे खारघर व तळोजा परिसरातील सिडकोनिर्मित गृहसंकुलांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांच्या निवारणाचा मार्ग मोकळा झाला आहे.