

Panvel Municipal Election Reservation Draw
पनवेल : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुरू असलेल्या आरक्षण सोडत प्रक्रियेदरम्यान आज (दि.१७) मोठा गोंधळ उडाला. विविध राजकीय पक्षांच्या आक्षेपांमुळे हा कार्यक्रम काही काळासाठी बंद करण्यात आला. आरक्षण सोडत चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत शेकाप, मनसे, काँग्रेस आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर थेट आंदोलनाची भूमिका घेतली.
सोडत कार्यक्रम सुरू असताना काही राजकीय नेत्यांनी आरक्षण वर्गीकरणात गंभीर तृटी असल्याचे सांगत कार्यक्रम तात्काळ थांबवावा, अशी मागणी केली. या वेळी काही नेते आयुक्त व निवडणूक प्रशासक मंगेश चितळे यांच्या टेबलासमोरच बसले व प्रक्रिया पुढे न नेण्याचा आग्रह धरला. अचानक झालेल्या या गोंधळामुळे आरक्षण प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यापूर्वी ११ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या ७८ प्रभागांसाठी आरक्षण सोडत घेण्यात आली होती. त्यानुसार आरक्षण जाहीरही झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने पालिका हद्दीतील १४ प्रभागात नागरिकाचा मागास प्रवर्ग, ६ आणि सर्वसाधारण महिला साठी बदल सुचवले होते. त्या नुसार आज निवडणूक आयोग प्रशासक आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुन्हा सोडत कार्यक्रम घेण्यात आला त्या वेळी हा गोंधळ घालण्यात आला.
निवडणूक आयोगाने सुचवलेल्या बदलांनुसारच आजची सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही पक्षांनी आक्षेप नोंदविला होता, मात्र काही वेळा नंतर, आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, निवडणूक आयोगाच्या सूचने नुसार आरक्षणाची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे.
- मंगेश चितळे आयुक्त (प्रशासक)