

खोपोली : प्रशांत गोपाळे
खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपून काढले. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लागलेले पत्रे, घरे व इमारतींवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्याने अनेकांची या परतीच्या पावसाने धांदल उडावल्याचे पाहायला मिळाले.
खोपोलीसह खालापूर तालुक्यातील मंगळवारी सायंकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. हस्त नक्षत्रातील या पावसासोबत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची मोठी धावपळ जोरदार वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. काही ठिकाणी संरक्षणासाठी उभारण्यात आलेले पत्रे व लोखंडी संरचना वाऱ्याच्या तडाख्याने उडून गेल्या, तर काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झाला.
संध्याकाळी पाचच्या सुमारास खोपोलीसह खालापूर पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांना हवामानाचा रौद्र अवतार अनुभवायला मिळाला. पाऊस आणि वाऱ्याचा जोर तब्बल एक तास जाणवत होता. खोपोली शहरातील चिंचवली, शेडवली, पटेलनगर, शिळगाव तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांच्या परिसरात वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.
काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी विजेच्या तारांसह खांब कोसळल्याचे दिसून आले.सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नाही. तर खोपोली येथे लायन्स क्लब समोर मुंबई पुणे महामार्गावर नवनिर्मितीसाठी लावण्यात आले पत्रे, रस्त्यावर कोसळले. यात सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही.
दरम्यान, अनेक रस्त्यांवर झाडे व फांद्या पडल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले होते. नगरपालिका अग्निशमन दल, खोपोलीतील हेल्प फांऊडेशन कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने मदत कार्य करून आपत्कालीन मदत केली.
तयार होणारे भातपिक कोसळले
भात पीक उत्तम बहरले असून भात पीक तयार होत आहे. मात्र जोरदार हवा व परतीचा पाऊस असाच कोसळल्यास शेतकन्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वीज कर्मचाऱ्यांची धावपळ
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला. परिस्थितीची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विजेचे खांब उभारणे. तुटलेल्या तारांची पाहणी करणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी पावसाची पर्वा न करता काम करताना दिसून आले.
पावसाचे स्वरूप बदलले
यंदाच्या पावसाचे स्वरूप अनेकदा बदलताना दिसून आले. काही काळ पावसाने उघडीप दिल्यानंतर अचानक जोरदार सरी कोसळणे आणि त्यासोबत सोसाट्याचा वारा सुटणे, असे चित्र परिसरात पाहायला मिळाले.