

Karnala Bird Sanctuary
खारघर : पुढारी वृत्तसेवा
पनवेल तालुक्यातील मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध असेलेले आणि लिंगोबाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेले कर्नाळा अभयारण्य पर्यटकांचे आवडीचे ठिकाण ठरले आहे. पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले घनदाट अरण्याने घेरलेले चिमणी पाखरांचा चिवचिवाट आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असे लाभलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणून या पक्षी अभयारण्याकडे पाहिले जाते.
कर्नाळा अभयारण्य सुट्टीच्या दिवसात पर्यटकांचे आवडीचे ठिकाण ठरत आहे. गर्मीचे दिवस सुरू झाले असताना थंड हवा आणि घनदाट सावलीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आपल्या मुलांना घेऊन सुट्टीचा दिवस कुटुंबासोबत घालवण्यासाठी अभयारण्यात येत असतात. मुंबई ते पुण्यापासून उन्हाळी सुट्टीत 6 हजारांच्यावर पर्यटकांनी अभ्यारण्यात हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. हे ठिकाण निसर्गप्रेमींचे आवडीचे ठिकाण ठरत असून, पर्यटकांकडून आकारण्यात येणार्या शुल्कातून वनविभागाच्या महसुलातसुद्धा भर पडत आहे.
पनवेल शहरापासून 12 किमी अंतरावर अतिशय सुंदर रमणीय व विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी व पक्ष्यांनी समृध्द असे कर्नाळा अभयारण्य आहे. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. हिरवागार निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत.
या शिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ, पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे 134 प्रजातींचे स्थानिक तर 38 प्रजातींचे स्थलांतरीय पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात.
या पक्षी अभयारण्यात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्मिती म्हणून येतील कॅन्टीन चालवण्यास दिले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी नाष्टा, जेवण इथं उपलब्ध असते. महिला सक्षमीकरण करावे म्हणून सरकार काम करत आहे. याची प्रचिती इथला बचत गटांचा महिला समूह एकजुटीने काम करताना पाहून येते. येणाऱ्या पर्यटकांच्या लहान मुलांची काळजी घेताना पाहून येणारे पर्यटक सुद्धा या बचत गटाचे कौतुक करतात.