

Leopard found in the vicinity of Kalavali village
पोलादपूर : धनराज गोपाळ
पोलादपूर तालुक्यातील काळवली गावच्या जंगल भागात बिबट्या असल्याचे (रविवार) रात्री मुख्य रस्त्यावरून जाताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. सदर घटनास्थळाची पाहणी वन विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरवर्षी ऐन उन्हाळ्यातच काळवली पवारवाडी, विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जाताना येताना बिबट्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगर भागात असलेल्या काळवली विठ्ठलवाडी, पवारवाडी व भोसलेवाडी परिसरात घनदाट जंगल असल्याने येथील नागरिकांमध्ये बिबट्याचा वावर सुरू झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विठ्ठलवाडी येथील जंगलात असलेला म्हसोबा तलाव २०२१ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर्णतः मातीने बुजून गेला आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी तळभागाकडे आपला मोर्चा वळवला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वन विभागाकडून घनदाट जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली, तर वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी जंगलातून लोकवस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होवू शकते. काळवली गावातील नागरिकांच्या गंभीर समस्येचे वन विभागाकडून तात्काळ निवारण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेची माहिती समजतात वन क्षेत्रपाल राकेश साहू व परिमंडळ अधिकारी बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियत क्षेत्र अधिकारी संदिप परदेशी व परीमंडळ कर्मचारी यांनी काळवली पाटीलवाडी व हावरे गावात जाऊन बिबट्या पळवून लावण्यासाठी फटाक्यांचे वाटप केले. तसेच गावातील लहान बालके महिलांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत जनजागृती केली आहे.
पोलादपूर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात डोंगर-दऱ्या खोऱ्यात बिबट्याचा वावर असू शकतो, हे वन विभागाने मान्य केले आहे. नागरिकांनी स्वतःची संरक्षण आणि दक्षता घेण्यासाठी रात्रीच्यावेळी एकटे बाहेर पडू नये तसेच काठी व बॅटरीचा आधार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.