Hapus in Raigad | रायगडमधील हापूस आंब्याच्या दररोज 7 हजार पेट्या बाजारात
रायगड : जयंत धुळप
सद्यस्थितीत तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील हापूस आंब्याची नवी मुंबई बाजार समितीमधील आवक हळूहळू कमी होत आहे. मात्र, त्याच वेळी रायगड जिल्ह्यातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज हापूस आंब्याच्या किमान 7 हजार पेट्या बाजारात दाखल होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकळ यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातून येणार्या हापूस आंब्यामध्ये अलिबाग, मुरुड, रोहा आणि महाड या चार तालुक्यांतील आंबा आघाडीवर आहे. अलिबाग तालुक्यातून येणार्या आंब्याची एक पेटी 2 डझनची, तर उर्वरित तालुक्यांतून येणार्या आंब्याची एक पेटी पाच डझनची आहे. रायगडमधील आंब्याला 500 ते 700 रुपये डझन असा सध्या भाव मिळत आहे.
हापूस उत्पादनाला हवामान बदलाचा फटका
कोकणात यंदा हापूसचे उत्पादन चांगले असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होत. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाने आंबा उत्पादन कमी झाले आहे. हंगामालाही सुरुवात होण्यास विलंब झाला असून, आवक कमी होत आहे. 15-20 मेपर्यंत तळ कोकणातील हापूसचा हंगाम राहील.
यंदा हापूस हंगामास उशिरा सुरुवात
एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू होताच कोकणातील हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होत असते. या वर्षी हापूस हंगामाला उशिराने सुरुवात झाली. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हापूसची तुरळक आवक होती, तर मार्च अखेरपासून खर्या अर्थाने आवक वाढण्यास सुरुवात झाली. तथापि, आवक घटल्याचेही काही आंबा बागायतदारांनी सांगितले. यंदा कोकणातील हापूसचे 40 टक्के उत्पादन असून, हंगाम केवळ 40 दिवसांचा आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तळ कोकणातील हापूसची आवक कमी झाली आहे.
असा आहे हापूसचा हंगाम
7000 हापूस आंब्याच्या पेट्या दररोज दाखल होत आहेत बाजारात
500-700 रुपये डझन दर आहे रायगड जिल्ह्यातील हापूस आंब्याला
2025 मे अखेरपर्यंत चालणार रायगड हापूस आंब्याचा हंगाम
20 मेपर्यंत चालणार तळ कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम
40 टक्के कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन यंदाच्या हंगामात

