

नेरळ : कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने भोई समाजाच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असल्याची चिंता अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाने व्यक्त केली आहे. नदीची पाणीपातळी पूर्ववत राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नदीपात्रातील पाणी अडविण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण, वाढते तापमान आणि पाण्याचे बाष्पीभवन यामुळे नदी, तलाव आणि धरणांच्या पाणीपातळीवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कर्जत तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने उल्हास नदी काही काळ तुडुंब भरून वाहत होती. मात्र, गणपती विसर्जनाच्या काळात कर्जत शहरातील उल्हास नदीवरील बंधाऱ्यातील लोखंडी प्लेटी योग्य प्रकारे न बसवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आणि नदीची पाणीपातळी झपाट्याने खालावल्याचा दावा भोई समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
उल्हास नदीवर अवलंबून असलेल्या कर्जत शहरातील सुमारे १५० ते २०० भोई समाजाच्या कुटुंबांच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचे संघटनेने सांगितले. पाण्याची पातळी अशीच कमी राहिल्यास मासेमारी व्यवसायाबरोबरच शहरातील बोअरवेल आणि नैसर्गिक विहिरींच्या पाणीपातळीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
“प्लेटी तातडीने दुरुस्त करून नदीतील पाण्याची पातळी योग्य पद्धतीने राखावी. अन्यथा भोई समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल गोविंद पवार यांनी प्रशासनाला दिला.
दरम्यान, उल्हास नदीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अखिल महाराष्ट्र भोई समाजाचे पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजकार्यकर्ते अशोक महाडिक, अनिल पवार यांच्यासह रघुनाथ पवार, अरुण महाडिक, विजय थोरवे, महेंद्र महाडिक, कृष्णा सालेकर, सचिन पवार, किरण पवार, सचिन महाडिक, दीपक बामणे, प्रकाश थोरवे, आतिश सकपाळ, रमेश पवार, यशवंत पवार, दशरथ पवार, प्रकाश जाधव, विनायक पवार, रवी पवार आदी उपस्थित होते. उल्हास नदीतील पाणीपातळी आणि बंधाऱ्याच्या प्लेटींची स्थिती याबाबत प्रशासनाकडून नेमकी काय उपाययोजना केली जाते, याकडे आता भोई समाजाचे लक्ष लागले आहे.
टप्प्याटप्प्याने बंधारे बांधण्याची मागणी
उल्हास नदीपात्रात टप्प्याटप्प्याने सुमारे तीन ते चार फूट उंचीचे काँक्रीटचे बंधारे उभारून पाणी अडवावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाने केली आहे. त्यामुळे नदीतील पाणीपातळी काही प्रमाणात कायम राखण्यास मदत होईल, तसेच दरवर्षी लोखंडी प्लेटी बसविणे आणि काढण्यावर होणारा खर्चही कमी होऊ शकतो, असा संघटनेचा दावा आहे.