

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मधील टिळकनगर, पाथर्ली, अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरात गेल्या सात-आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या घनकचऱ्याच्या गंभीर प्रश्नाची मंगळवारी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सरप्राईज व्हिजिटमुळे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. याच पाहणीत कंपनीच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल झाली.
प्रभाग क्रमांक २७ मधील कचरा संकलन आणि साफसफाईचे काम कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीकडून अपेक्षित काम होत नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांसह भाजपाच्या नगरसेवकांकडून सातत्याने करण्यात येत होती.
कंपनीचे कर्मचारी गणवेशात नसणे, कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन नसणे, तसेच कोणत्या कर्मचाऱ्याने कोणत्या भागात काम करावे याबाबत स्पष्ट व्यवस्था नसल्याच्या गंभीर तक्रारीही करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपाच्या नगरसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना प्रत्यक्ष प्रभागात सरप्राईज व्हिजिट करण्याची मागणी केली होती.
ही मागणी मान्य करत उपायुक्त डॉ. कोकरे यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊपासून दीड ते दोन तास टिळकनगर, पाथर्ली, अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी कचरा साफसफाई व वर्गीकरणाचे काम करणारे कर्मचारी आढळून आले नसल्याचे उपस्थित रहिवासी व नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले.
या परिस्थितीची उपायुक्त कोकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गंभीर दखल घेतली. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून कंपनीच्या व्यवस्थापकासोबत सविस्तर चर्चा केली. कंपनीला कामकाज तातडीने सुधारण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून प्रभागातील कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान भाजपाच्या प्रभाग क्रमांक २७ मधील नगरसेवकांनी उपायुक्त कोकरे यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांकडे मागणी केली की, यापूर्वी महापालिकेच्या सफाई कर्मचारी यांच्या मार्फत प्रभागातील साफसफाईची व्यवस्था व्यवस्थित होत होती. मात्र संबंधित कंपनीकडे कंत्राट दिल्यानंतर प्रभागातील अनेक भागांमध्ये कचरा साचल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर बनल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. काही सोसायट्यांत कचरा बाहेर न टाकता तो काही काळ घरात साठवण्याच्या सूचना रहिवाशांना द्याव्या लागत असल्याचे विदारक चित्रही यावेळी सांगण्यात आले.
महासभेत स्वच्छतेसह सुरक्षेचा मुद्दा गाजवणार
प्रभाग क्र. २७ मधील संबंधित कंपनीचे कंत्राट तत्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी आगामी महासभेतही प्रभाग क्र. २७ मधील भाजपाचे सर्व नगरसेवक मांडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाहणी दौऱ्यादरम्यान ॲड. मनोज घरत यांच्यासह नगरसेवक महेश पाटील, मंदा पाटील, अभिजित थरवळ, संजय विचारे, संजय तथा अण्णा राणे, गोपाळ देशपांडे, गणेश मगरे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.