

जयंत धुळप
रायगड: महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास आणि मालवाहतुकीला मोठी गती देण्यासाठी भारतीय रेल्वेने कर्जत रोहा थेट नवा रेल्वेमार्ग निर्माण करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
मध्य रेल्वेवरील १७२ कोटी रुपये खर्चाच्या ३.७ किमी लांबीच्या 'सोमटाणे-चिखली कॉर्ड लाईन' (जोड-मार्ग) प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या नवीन जोड-मार्गामुळे कर्जत आणि रोहा कॉरिडॉरदरम्यान थेट संपर्क प्रस्थापित होणार असून, मुंबई विभागातील अत्यंत व्यस्त अशा पनवेल जंक्शनवरील गाड्यांचा ताण कमालीचा कमी होणार आहे.
पनवेल जंक्शनची कोंडी फुटणार आणि इंजिन रिव्हर्सलपासून मुक्ती मिळणार सध्या पनवेल हे मुंबई रेल्वे विभागातील सर्वात गजबजलेले जंक्शन मानले जाते, जिथून रोहा, जेएनपीटी, कर्जत आणि दिवा या चार प्रमुख दिशांनी रेल्वे वाहतूक नियंत्रित केली जाते.
कर्जत आणि रोहा मार्गांदरम्यान थेट रेल्वे मार्ग उपलब्ध नसल्यामुळे, सध्या गाड्यांना पनवेल जंक्शनवर यावेच लागते. तिथे आल्यानंतर गाड्यांचे इंजिन विरुद्ध दिशेला जोडण्यासाठी (इंजिन रिव्हर्सल) बराच वेळ वाया जातो, ज्यामुळे परिचालनविषयक अडचणी आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
मंजूर झालेली ही नवी 'कॉर्ड लाईन' कर्जत मार्गावरील चिखली आणि रोहा मार्गावरील सोमटाणे या दोन स्थानकांना थेट जोडेल, ज्यामुळे गाड्यांना पनवेल जंक्शनमध्ये प्रवेश न करताच थेट पुढे जाणे शक्य होईल.
जेएनपीटी मालवाहतुकीला मोठी गती आणि वेळेची होणार मोठी बचत
हा प्रकल्प प्रामुख्याने जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPT) शी संबंधित मालवाहतुकीसाठी गेमचेंजर ठरणार आहे, कारण हे बंदर देशातील सुमारे ६० टक्के कंटेनर वाहतूक हाताळते. सध्या कर्जत, जसाई आणि रोहा दरम्यान धावणाऱ्या मालगाड्यांना पनवेल येथे इंजिन बदलण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते.
नवीन कॉर्ड लाईन कार्यान्वित झाल्यावर मालगाड्या पनवेलला वळसा घालून थेट निघून जातील. यामुळे प्रत्येक मालगाडीच्या थांबण्याच्या वेळेत (डिटेंशन टाइम) अंदाजे ११० मिनिटांची म्हणजेच सुमारे पावणेदोन तासांची बचत होईल. परिणामी गाड्यांचा फेऱ्यांचा कालावधी आणि लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता यात लक्षणीय सुधारणा होईल.
अतिरिक्त वाहतूक क्षमता आणि रेल्वे नेटवर्कची वाढती कार्यक्षमता
हा ३.७ किमीचा नवीन जोड-मार्ग पूर्ण झाल्यावर रेल्वे नेटवर्कची क्षमता अफाट वाढणार आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी अतिरिक्त नऊ दशलक्ष टन (९ एमटीपीए) इतकी मालवाहतूक करणे रेल्वेला शक्य होईल. हा मार्ग जेएनपीटी-कर्जत आणि जेएनपीटी-रोहा दरम्यान आधीच मंजूर झालेल्या 'पनवेल एलिव्हेटेड कॉर्ड लाइन्स'ला पूरक ठरेल.
या मंजुरीसह, भारताच्या वाढत्या लॉजिस्टिक्स आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने क्षमता विकास आणि मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीच्या दिशेने आपले पाऊल अधिक भक्कम केले आहे.