Vasai Virar landslide: वसई-विरार मनपाचे ३३ दरडप्रवण व ६५ सखल भागांवर विशेष लक्ष

पावसाळ्यासाठी महापालिकेची खबरदारी
Vasai Virar landslide
Vasai Virar landslidePudhari
Published on
Updated on

विरार: पावसाळ्याच्या काळात उद्भवू शकणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील संवेदनशील भागांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील ३३ दरडप्रवण क्षेत्रे तसेच ६५ सखल व पाणी साचणारे भाग ओळखण्यात आले असून या ठिकाणी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महापालिकेने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार यंदा पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी अशा भागांची संख्या ४४ होती, तर यावर्षी ती वाढून ६५ वर पोहोचली आहे.

Vasai Virar landslide
11th Admission: राज्यात अकरावीच्या १६ लाख जागा रिक्त! एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ २८.८८ टक्के जागांवर प्रवेश

त्यापैकी सर्वाधिक १६ सखल भाग नालासोपारा (पश्चिम) परिसरात असून नवघर-मानिकपूर विभागात ११ ठिकाणे संवेदनशील म्हणून नोंदविण्यात आली आहेत. या भागांमध्ये पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी तसेच जलनिकासी सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ३३ ठिकाणांचीही नोंद करण्यात आली आहे. अशा भागांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच मुसळधार पावसादरम्यान अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावण्याबरोबरच नियमित पाहणीही केली जाणार आहे.

संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग २४ तास कार्यरत राहणार आहे. विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Vasai Virar landslide
Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान

पूरस्थिती अथवा अन्य आपत्कालीन घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून फायर बोटी, रेस्क्यू उपकरणे, स्ट्रेचर, पोर्टेबल पंप, लाईफ जॅकेट आणि लाईफ बॉय यांसारखी अत्याधुनिक साधने सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण निवाऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक यंत्रणांची माहिती आणि संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news