

पनवेल : कामोठे परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास एक हिट ॲन्ड रन प्रकारातील थरारक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतील एका चालकाने आपल्या स्वतःच्या ताब्यात असलेल वाहन नंबर एम एच 02 बीजी 6723 स्विफ्ट या वाहनाने एका महिलेला धडक दिली आणि त्यानंतर नियंत्रण हरपलेल्या अवस्थेत अन्य वाहनांना धडक देत परिसरात खळबळ उडवून दिली. संतप्त नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत आरोपीला गाठून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.या घटनेमध्ये जखमी झालेल्या महिलेवर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ही घटना कामोठे सेक्टर ६ ए येथील सरोवर हॉटेलच्या समोर घडली. प्रारंभी, आरोपी चालकाने एका महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातानंतरही त्याने वाहन न थांबवता वेगात पुढे जात सरोवर हॉटेलसमोरील पार्किंगमधील काही वाहनांना धडक दिली. या धडकांमुळे काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, ही संपूर्ण घटना पाहताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद चालकाने वाहन अधिक वेगात पुढे नेत रस्त्यावरील आणखी एका वाहनाला जोरदार धडक दिली. यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या गोंधळादरम्यान नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाहन अडवले आणि त्या चालकाला बाहेर ओढून चांगलाच चोप दिला. नंतर कामोठे पोलिस ठाण्याला माहिती देऊन वाहन चालकाला कामोठे पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, आरोपी वाहनचालक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते.
कामोठे परिसरात घडलेली ही घटना पुन्हा एकदा मद्यधुंद चालकाने वाहन चालविण्याच्या धोकादायक प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी ठरली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, अशा बेधुंद चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.