

जळगाव : जळगाव शहरात गुरुवारी (दि. १९) रात्री ८ च्या सुमारास मद्यधुंद चारचाकी चालकाने भरधाव कार चालवित महिलेला उडवून पुढे आणखी दोघांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर पळून जाताना कार चिखलात रुतल्याने नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी (दि.19) रात्री ८ च्या सुमारास महाबळ परिसरात वंदना सुनील गुजराथी (45) वर्षीय महिला रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर कार चालकाने सुसाट जात पुढे अन्य दोघांनाही धडक दिली. नागरिकांनी कारचालकास थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक मद्यधुंद असल्याने त्याने अधिकच वेगाने कार चालवित धुमाकूळ घातला. यात वाघनगर परिसरातील काही घरांच्या बाहेरील कुंड्या आणि बाकही तोडले. मात्र, पुढे काही अंतरावर गेल्यावर कारचे टायर चिखल्यात रुतल्याने कार जागेवर थांबली. त्यानंतर नागरिकांनी चालकाला बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. रामानंदनगर आणि तालुका पोलिसांनी मद्यधुंद वाहनचालक मोंटू सैनी याला ताब्यात घेतले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.