

उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी येथील सर्व पाच कंटेनर टर्मिनल्स सध्या कोणत्याही गर्दीशिवाय आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. मात्र टर्मिनल यार्डमधील आयात कंटेनर्सची उचल करण्यासाठी सीएफएस आणि सीबी यांच्याकडून ट्रेलर्स आणि चालकांची पुरेशी उपलब्धता नसल्याने वितरणास विलंब होत आहे.
सीएफएसएआय आणि बीसीबीए यांच्याकडून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर, बंदरातील प्रत्यक्ष स्थिती मांडण्यासाठी जेएनपीएने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्या बंदरात दररोज सरासरी 10 ते 12 जहाजे दाखल होत असून, सुमारे 22 हजार टीईयू कंटेनर मालाची यशस्वी हाताळणी केली जात आहे. रस्ते आणि रेल्वेमार्गे होणारी वाहतूकही स्थिर असून गेट ऑपरेशन्समध्ये कोणताही अडथळा नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
बंदरात गर्दी असल्याचे दावे फेटाळून लावताना जेएनपीएने स्पष्ट केले की, सध्याची अडचण ही बंदर टर्मिनल्समध्ये नसून कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) आणि कस्टम ब्रोकर्स (सीबी) यांच्या स्तरावर आहे. विशेषतः सुट्ट्यांमुळे चालकांची कमतरता भासत असून, यामुळे टर्मिनलमध्ये येणाऱ्या ट्रेलर्सची संख्या घटली आहे.
टर्मिनल्समध्ये ट्रेलर्सची कोणतीही रांग प्रलंबित नसून, उलट प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी जेएनपीएकडून विविध सक्रिय उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये रेल्वे सायडिंग असलेल्या सीएफएसपर्यंत रेल्वेमार्गे जलद वाहतूक करणे आणि सीमाशुल्क विभागाशी समन्वय साधून मंजुरी प्रक्रियेला गती देणे यांचा समावेश आहे.
कामकाजावर विपरित परिणाम नाही
जेएनपीएची एकूण क्षमता 1.76 लाख टीईयू असून सध्याची ऑक्युपन्सी 1.18 लाख टीईयू (सुमारे 67 टक्के) इतकीच आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय स्थितीमुळे ट्रान्सशिपमेंट कार्गोमध्ये वाढ झाली असली तरी, त्यामुळे कामकाजावर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. जेएनपीएने शेवटी आवाहन केले आहे की, आयात कंटेनर्सची प्रलंबित स्थिती दूर करण्यासाठी सीएफएस आणि कस्टम ब्रोकर्सनी तातडीने पुरेशा ट्रेलर्सची व्यवस्था करावी, जेणेकरून ग्राहकांना दिली जाणारी सेवा अधिक वेगवान होईल.