

पाली ः शरद निकुंभ
आजचा समाज एका अशा वळणावर उभा आहे, जिथे तंत्रज्ञानाने आयुष्य सुलभ केले असले, तरी माणुसकी, संवेदना आणि क्षण अनुभवण्याची कला हळूहळू हरवत चालली आहे. मोबाईल, कॅमेरा आणि सोशल मीडियाने फक्त शहरापुरतेच नाही, तर आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत देखील आपला प्रभाव पसरवला आहे. खेडेत जिथे पूर्वी सण-समारंभ हे प्रत्यक्ष संवाद, नातेसंबंध आणि आपुलकी जपण्याचे माध्यम होते, आज तिथेही “दाखवण्याची” मानसिकता हळूहळू बळावत आहे.
धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये लोक प्रत्यक्ष उपस्थित असतात, पण मनाने त्या क्षणात नसतात. हातात मोबाईल, नजरा स्क्रीनवर आणि विचार ‘पोस्ट’ व ‘लाईक्स’कडे. हीच आजच्या समाजाची मानसिकता बनत चालली आहे. अनुभव ऐवजी प्रदर्शन महत्त्वाचं ठरत असल्यामुळे, क्षण जपण्याऐवजी त्याचा “कव्हरेज” करणं लोकांची प्राथमिकता बनली आहे.
पूर्वी कोणताही कार्यक्रम म्हणजे सहभागी होण्याचा अनुभव असायचा. आज मात्र तो ‘कव्हर’ करण्याचा कार्यक्रम झाला आहे. मंदिरात आरती सुरू असताना भक्तीपेक्षा मोबाईल स्क्रीन उजळलेली दिसते. हात जोडण्याआधी फोटो काढण्याची घाई, दर्शनापेक्षा व्हिडिओ महत्त्वाचा वाटणारी मानसिकता आणि देवापेक्षा कॅमेऱ्याकडे वळलेली नजर या सगळ्यातून श्रद्धेचा मूळ अर्थच हरवत चालल्याचे चित्र आहे.
हळदीकुंकू, सण-समारंभ यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांत पूर्वी ओटीतून माया, गप्पांतून आपुलकी आणि भेटीतून नातेसंबंध दृढ होत असत. आज मात्र ओटी भरण्याआधी फोटो, संवादाआधी व्हिडिओ आणि कार्यक्रम संपताच सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याची घाई दिसते. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा स्क्रीनकडे पाहणाऱ्या नजरा अधिक असल्याने नात्यांमधील ऊब कमी होत चालल्याची भावना अनेक ज्येष्ठ व्यक्ती व्यक्त करत आहेत.
लग्नसमारंभ हे तर या बदलाचं ठळक उदाहरण ठरत आहेत. आई-वडिलांचे अश्रू, निरोपाची वेदना, नात्यांची ओढ हे सगळे भावनिक क्षण आता नियोजनबद्ध झाले आहेत. कॅमेऱ्यासाठी थांबणे, पुन्हा तेच क्षण ‘रिटेक’मध्ये अनुभवणे आणि नैसर्गिक भावना कृत्रिम पोझमध्ये बदलणे यामुळे विवाहसोहळा हा अनुभव न राहता केवळ दृश्य कार्यक्रम ठरत आहे.
या सगळ्यातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे मृत्यूच्या प्रसंगीही हीच मानसिकता दिसून येत आहे. शोक व्यक्त करण्याऐवजी फोटो काढणे, व्हिडिओ तयार करणे आणि ते सोशल मीडियावर शेअर करणे ही बाब अनेकांना अस्वस्थ करणारी ठरत आहे. जिथे शांत उपस्थिती, शब्दाविना आधार आणि संवेदनशीलता अपेक्षित असते, तिथे मोबाईल कॅमेऱ्यांचा वापर ही सामाजिक संवेदनशीलतेची गंभीर घसरण दर्शवतो.
ग्रामीण आणि शहरी समाजातील हा फरकही येथे लक्षात घ्यावा लागेल. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी क्षण जगण्याची संस्कृती टिकून आहे. सण, समारंभ किंवा दुःखाच्या प्रसंगी माणसांची उपस्थिती, संवाद आणि वेळ देणे महत्त्वाचे मानले जाते. शहरांमध्ये मात्र वेग, दिखावा आणि प्रसिद्धीच्या ओढीत क्षण ‘कंटेंट’ बनत चालल्याचे स्पष्टपणे दिसते.
वास्तव क्षण जगण्याची गरज
कार्यक्रमांचे क्षण टिपण्याऐवजी तो जगण्याची जाणीव जर समाजात पुन्हा निर्माण झाली, तरच सण, समारंभ आणि नाती पुन्हा अर्थपूर्ण ठरतील. अन्यथा फोटो, पोस्ट आणि व्हिडिओ राहतील पण त्यामागची माणुसकी हळूहळू निसटत जाईल, हे वास्तव नाकारता येणार नाही.