

महाड : श्रीकृष्ण बाळ
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर कशेळी येथील ‘कनकादित्य’ या सूर्यदेवाच्या मंदिराला 1300 वर्षापूर्वीची अखंड सूर्य उपासनेची परंपरा असल्याचे संशोधन पुरातत्व शास्त्र अभ्यासक डॉ. संजय धनावडे यांनी मांडले आहे. आपण अभ्यासाअंती हे निष्कर्ष प्रकाशित करत असल्याचे ते म्हणाले.
कोकणात एकेकाळी मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेल्या सूर्योपासनेचे ठोस पुरावे आजही दक्षिण कोकणातील विविध सूर्य मंदिरे आणि सूर्यमूर्तींतून दिसून येतात. कशेळीतील हे कनकादित्याचे मंदिर कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि सातत्याने पूजन केलेेले केंद्र असल्याचा महत्त्वपूर्ण शोध भारतीय संस्कृती व इतिहासाच्या अभ्यासात पुरातत्वशास्त्र अभ्यासक डॉ. संजय धनावडे यांनी मांडला.
या संशोधनातून मूर्तीशास्त्र, अभिलेखीय पुरावे, स्थानिक आख्यायिका आणि पुरातत्त्वीय साधने यांच्या आधारे केलेल्या या संशोधनातून कनकादित्याची सूर्यमूर्ती ही इसवी सन सातव्या शतकाच्या मध्यकाळातील असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती समभंग अवस्थेतील असून, हातात पद्म धारण केलेला सूर्य, प्रभावलय, करंडक मुकुट, जंघिका प्रकारचे अधोवस्त्र आणि पायाशी कोरलेल्या प्रतिमा ही वैशिष्ट्ये बदामी चालुक्य काळातील सूर्यप्रतिमांशी साधर्म्य दर्शवित असल्याचे ते शोधनिबंधात म्हणतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी दिलेले हे दान, त्या काळात आडिवरे हे सूर्योपासनेसाठी सुप्रसिद्ध केंद्र होते, याची स्पष्ट साक्ष देते. कालांतराने आदित्यवाडचे अट्टविरे आणि पुढे आजच्या आडिवरे या नावात रूपांतर झाल्याचे त्यांनी आपल्या शोध निबंधात म्हटले आहे. कशेळी हे आडिवरे गावाचे एक प्राचीन वाडे असण्याची दाट शक्यता असून, कनकादित्याची मूर्ती याच सूर्योपासनेच्या परंपरेतून येथे स्थापन झाली असावी.
स्थानिक आख्यायिकेनुसार गुजरातमधील प्रभासपाटण येथून समुद्रमार्गे आणलेल्या सूर्यमूर्तीची विधिवत स्थापना एका सूर्योपासक गणिकेने केली आणि त्यामुळे ‘कनकेचा आदित्य’ म्हणजेच कनकादित्य हे नाव रूढ झाले. अशी कथा येथे पूर्वीपासून सांगितली जात असली तरी सूर्य देवाची ही अलौकिक मूर्ती स्थानिक रित्या घडवली गेली असल्याचे मूर्ति शास्त्रीय लक्षणावरून लक्षात येत असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला आहे.
या संशोधनास शैक्षणिक मान्यता लाभली असून, सदर संशोधन भांडारकर प्राच्यविद्या संस्था, पुणे तसेच भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथे प्रकाशित झालेले आहे. त्यामुळे या शोधाचे ऐतिहासिक आणि शास्त्रीय महत्त्व अधिक अधोरेखित होते. विशेष म्हणजे, कनकादित्याचा रथसप्तमी उत्सव शेकडो वर्षांपासून अखंडपणे साजरा होत आहे. या उत्सवात आडिवरेच्या कालिका, जाखादेवी आणि भगवती या मूळ ग्रामदेवताच सहभागी होतात, ज्यातून स्थानिक सामाजिक व धार्मिक परंपरांची सातत्यपूर्ण परंपरा स्पष्ट होते.
या संशोधनासाठी कनकादित्य मंदिराचे सन्माननीय विश्वस्त रमेश ओळकर तसेच आडिवरे महाकाली देवस्थानचे विश्वस्त विश्वनाथ उर्फ बंधू शेटये यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे डॉ. संजय धनावडे यांनी नमूद केले आहे. एकूणच, आडिवरे-कशेळी परिसर हा सातव्याआठव्या शतकांपासून सूर्योपासनेचे एक प्रभावी व सुप्रसिद्ध केंद्र होते आणि कनकादित्याची सूर्यमूर्ती ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आजही सातत्याने पूजेत असलेली एक दुर्मीळ व महत्त्वपूर्ण पुरातन सूर्यमूर्ती असल्याचे या संशोधनातून स्पष्ट होत आहे. रविवारी रथसप्तमी निमित्त राजापूर तालुक्यातील कशेळी येथील सूर्य मंदिराचा इतिहास यावरील माझा संशोधन नुकतेच प्रकाशित झाले त्यातील हा मसुदा आहे.
आडिवरे हेच प्राचीन ‘आदित्यवाड’
या संशोधनातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आडिवरे हेच प्राचीन ‘आदित्यवाड’ असल्याचे स्पष्ट होते. बदामी चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा याने शके 664 (इ.स. 741742) मध्ये दिलेल्या नरवण ताम्रपटात आदित्यवाड येथे वास्तव्य करून दान दिल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे त्या काळात मकर संक्रांत हा सण आजप्रमाणे जानेवारीत नसून, सूर्याच्या स्थितीतील बदलांमुळे तो डिसेंबर महिन्यात येत असल्याचेही या अभ्यासातून लक्षात आले आहे. यावरून त्या काळात सूर्याच्या गती व उत्तरायणाच्या प्रारंभास अत्यंत धार्मिक महत्त्व दिले जात असल्याचे अधोरेखित होते.