

पनवेल: राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही पनवेल शहरासह तालुक्यातील खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तळोजा परिसरात गुटख्याची चढ्या दराने खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या कारवायांनंतरही हा अवैध व्यवसाय पुन्हा फोफावत असल्याने प्रशासनाच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभर गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाया सुरू झाल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होणारा गुटखा काही काळासाठी गायब झाला होता. तसेच पोलिसांनी वेळोवेळी छापेमारी करून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. मात्र या कारवायांचा प्रभाव फार काळ टिकला नसल्याचे सध्या दिसून येत आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यांनी अशा विक्रेत्यांविरोधात सातत्याने संयुक्त कारवाई करून पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याबरोबरच या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई केल्याशिवाय गुटखा विक्रीला आळा बसणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पालकांमध्ये तीव्र चिंता
कारवाईची तीव्रता कमी होताच शहरातील अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर ठिकाणी पुन्हा गुटख्याची विक्री सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. बंदी असलेल्या गुटख्याची जास्त दराने विक्री होत असून, ग्राहकांकडूनही वाढीव रक्कम आकारली जात असल्याचे सांगितले जाते.
याचबरोबर काही ठिकाणी भांगेच्या गोळ्या, इलेक्ट्रिक सिगारेट तसेच इतर अमली पदार्थही सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या पदार्थांची अल्पवयीन मुलांपर्यंतही सहज पोहोच होत असल्याने पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.