

खांदा कॉलनी: पनवेल तालुक्यातील कोळखे येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारातून माजी मंत्री महादेव जानकर यांची सुमारे १४ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात फसवणूक, विश्वासघात व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
तक्रारीनुसार, कोळखे परिसरातील जमीन विक्रीचा व्यवहार निश्चित करून संबंधित आरोपींनी मोठी रक्कम स्वीकारली. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही जमीन खरेदीखत करून देण्यात आले नाही तसेच प्रत्यक्ष ताबाही देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही व्यवहार पूर्ण न झाल्याने अखेर संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या व्यवहारात माजी मंत्री महादेव जानकर तसेच त्यांचे सहकारी राजेभाऊ फड यांचा आर्थिक हिस्सा अडकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू केली असून प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.