

पेण : स्वप्नील पाटील
मागील तीन चार दिवसांपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस पडत असून त्याचा फटका पेण तालुक्यातील भातशेतीला देखील बसला असल्याचे दिसून येत आहे. भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील खाडी लगतची भातशेती मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली असून आणखी दोन तीन दिवस सलग मुसळधार पाऊस पडल्यास पेण तालुक्यातील बळीराजावर दुबार पेलेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान या पाण्याखाली गेलेल्या भातशेतीचे पाहणी कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी केली असून त्यांनी देखील खाडी लगतची भातशेती पाण्याखाली गेलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे.पेण तालुक्यात जवळपास दहा हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जात आहे.
यामधील जवळपास 1200 ते 1500 हेक्टर जी खाडी लगतची भातशेती आहे ती कालपासून पाण्याखाली गेली असल्याची माहिती कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली आहे. तर खारेपाट भागातील खाडी लगत नसलेली काही जमीन आणि पूर्व भागात असलेली जमीन सद्यस्थितीला तरी संकट परिस्थितीत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
मागील दोन तीन दिवस मुसळभर पाऊस पडत असल्याने जी भातशेती पाण्याखाली गेली आहे, आणखी दोन तीन दिवस असाच मुसळधार पाऊस पडत राहिला आणि पाण्याचा निचरा झाला नाही तर मात्र पाण्याखाली गेलेली भाताची रोपे कुजून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते अशी शक्यता कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी व्यक्त केली आहे.