कसबा पेठ: ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित झालेले प्रथम दर्जाने संरक्षित असलेले शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन आहे. 17 व्या शतकात पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू शिवरामभट चित्रावस्वामी यांनी या मंदिराची उभारणी केली असल्याचे सांगितले जाते.
या मंदिराच्या निर्मितीविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू शिवरामभट चित्रास्वामी यांनी ध्यानधारणा करण्यासाठी गणेशखिंड येथील गणेश मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा केलेला विकास, येथील शांत वातावरण यामुळे ध्यानधारणासाठी शहरातील लोक रोज तिथे येऊ लागले. (Latest Pune News)
त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चित्रास्वामी यांनी जवळच बुजून गेलेल्या विहिरीत गाळ उपसण्याचे काम हाती घेतले. विहिरीतील गाळाचा उपसा करत असतानाच त्यांना सोन्याच्या मोहरा सापडल्या. त्यांनी त्या पेशव्यांना सादर केल्या.
पेशव्याने त्या विश्वासाने स्वीकार करीत याचा वापर कसा करावा याविषयीचा सल्ला विचारला. इ.स. 1800 च्या सुरुवातीला पुणे शहरात कोणतेही मंदिर नव्हते. पुण्येश्वर-नारायणेश्वर मंदिरे उद्धवस्त झाली होती. त्यामुळे शंकराचे भव्य मंदिर उभारावे, अशी इच्छा शिवभक्त चित्रावस्वामी यांनी पेशव्यांकडे केली. शंकराचा वास्तव्य स्मशानात असतो, असा म्हटले जाते. त्यामुळे मुठा नदीकाठची जागा त्यांनी निवडली. शनिवारपेठेतील नदी वळते तेथे त्यांची निर्मिती त्यांनी केली.
8 दिशादर्शक कळस व 9 वा कळस मध्यभागी असून, संपूर्ण मंदिर दगडी भिंतीनी बांधले आहे. पानशेत पुरामध्ये मंदिराची काही पडझड झाली. मंदिराची दुरवस्था झाली. त्यामुळे मंदिराचे अध्यक्ष स्वर्गीय गिरीष बापट यांनी शासकीय निधी उपलब्ध करून मंदिर पुन्हा मूळ स्थितीत आणले.
श्रावणमासात अभिषेक-लघुरुद्रची व्यवस्था
मंदिरात दरवर्षी 5 महत्त्वाचे कार्यक्रम होतात. महारुद्र अभिषेक, हवन पूजा स्त्रीयांमार्फत केली जाते. श्रावणी सोमवारी अभिषेक मंदिराच्या पिंडीवर चक्क्याची पूजा मांडली जाते. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्र असे विविध कार्यक्रम दरवर्षी होत असतात. श्रावणमासानिमित्त चारही सोमवारी भाविकांसाठी अभिषेक-लघुरुद्र करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनासाठी यावर्षी युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले.
ओंकारेश्वर मंदिर पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराची पेशवे दफ्तरी यांची नोंद आहे. 1734 ते 1736 दरम्यान बांधलेल्या या मंदिरासाठी तब्बल 1 लक्ष 10 हजार रुपये खर्च आला, असे सांगितले जाते.
- धनोत्तम लोणकर, विश्वस्त, ओंकारेश्वर मंदिर