

पनवेल : कळंबोली परिसरात एका हळदी समारंभादरम्यान घडलेल्या चोरीच्या प्रयत्नामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भर गर्दीत ३५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तब्बल १८ तोळ्यांचे सोन्याची गंठण हिसकावण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला. मात्र, उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा डाव फसला आणि त्याला घटनास्थळावरून पळ काढता आला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोलीतील एका ठिकाणी हळदी समारंभ सुरू होता. या समारंभाला मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि पाहुण्यांची उपस्थिती होती. गर्दीचा फायदा घेत आरोपीने संधी साधत एका महिलेच्या गळ्यातील मौल्यवान गंठण हिसकावले आणि पळण्याचा प्रयत्न केला. गावातून बाहेर पडण्याचा मार्ग चोरट्याला माहीत नसल्याने चोरटा गावातच पळत राहिला, प्रसंगावधान राखत काही नागरिकांनी तत्काळ आरोपीचा पाठलाग केला. काही अंतरावर त्याला पकडण्यात यश आले. संतप्त नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख रजनीश इंद्रपाल केवट (रा. पनवेल) अशी झाली आहे. त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कळंबोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, विशेषतः सण-समारंभांमध्ये सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.