Foreign Job Fraud: उझबेकिस्तानमध्ये नोकरीच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक

उलवे येथील प्लेसमेंट एजन्सी; कंपनीच्या चालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
 Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

उरण: परदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा खळबळजनक प्रकार उरण तालुक्यातील उलवे परिसरात उघडकीस आला आहे. उझबेकिस्तान येथे चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन सहा तरुणांकडून तब्बल १० लाख ६ हजार ५१२ रुपयांची रक्कम उकळण्यात आली.

परंतु परदेशात पोहोचल्यानंतर कोणतीही नोकरी न देता त्यांना एका बांधकाम साईटवर डांबून ठेवून जबरदस्तीने काम करायला लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात 'एस एम प्लेसमेंट' आणि 'महाकाल मरीन रीक्वायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या चालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Fraud
Ganesh Idol Making: महाडमध्ये गणेशमूर्तीकारांची लगबग अंतिम टप्प्यात

दुर्गेश सिताराम यादव (वय ४६, सध्या रा. मुलुंड, मूळ रा. महाराजगंज, उत्तर प्रदेश) हे कारपेंटर म्हणून काम करतात, त्यांनीच उलवे पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांचे ओळखीचे एजंट रामसजन यादव उर्फ बबलू यादव याने त्यांना परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.

उलवे येथील सद्भावना सोसायटी, खारकोपर येथे कार्यालय असलेल्या 'एस एम प्लेसमेंट एलएलपी' आणि 'महाकाल मरीन रीक्वायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीचे संचालक संजीतकुमार सिंह, विजयसिंह आणि लालचंद राजू यांनी उझबेकिस्तानमध्ये कारपेंटरच्या कामासाठी महिना ५५० डॉलर (सुमारे ४५ हजार रुपये) पगार आणि दोन वर्षांचा करार करुन देण्याचे आश्वासन दिले.

या नोकरीच्या प्रक्रियेसाठी आरोपींनी दुर्गेश यादव आणि त्यांच्यासोबतच्या मो. ऐइहतश्मुल हसीबुर रहमान हक, मोहम्मद खुर्शीद नईमुद्दीन, मो. जिलानी मो. हैदर, राम सजीवन आणि स्वपन सरकार या सहा जणांकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये आणि वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली अतिरिक्त पैसे उकळले.

 Fraud
Ganesh Idol Making: महाडमध्ये गणेशमूर्तीकारांची लगबग अंतिम टप्प्यात

त्यानंतर १६ डिसेंबर २०२५ रोजी या सर्वांना उझबेकिस्तानऐवजी कझाकिस्तानच्या अल्माटी येथे तीन महिन्यांच्या टुरिस्ट व्हिसावर पाठवण्यात आले. तेथून त्यांना उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथील एका दूरवरच्या बांधकाम साईटवर नेऊन सोडण्यात आले.

ताश्कंद येथील या ठिकाणी कोणतीही कंपनी अस्तित्वात नव्हती. पीडित तरुणांना २० ते २५ दिवस कोणतेही काम न देता एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना कोणताही पगार न देता जबरदस्तीने मजुरीचे काम करण्यास भाग पाडण्यात आले. दोन महिने उलटूनही पगार न मिळाल्याने त्यांनी विचारणा केली असता, आरोपी विजयसिंह यांनी त्यांच्या पगाराचे ६,६०० डॉलर परस्पर लाटल्याचे उघडकीस आले.

 Fraud
Fallow Land Farming: महाडमधील उजाड जमिनींवर फुलणार शेती

तरुणांनी भारतात परत जाण्याची विनंती केली असता, त्यांच्याकडून इच्छेविरुद्ध अतिरिक्त १५ दिवस मोफत काम करून घेण्यात आले आणि त्यानंतर मार्च २०२६ मध्ये पाच जणांची सुटका करून त्यांना भारतात परत पाठवण्यात आले. तक्रारदार दुर्गेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सहावा तरुण स्वपन सरकार हा अजूनही ताश्कंद येथेच अडकून पडला असून त्याचा व्हिसा संपल्याने तो अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिथे दिवस काढत आहे.

भारतात परतल्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास नकार देत हाकलून लावले. अखेर फसवणूक झालेल्या तरुणांनी उलवा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली असून पोलीस उपनिरीक्षक तुकाराम कोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नोकरी न देता काम करायला लावल्याची माहिती  उझबेकिस्तान येथे चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन सहा तरुणांकडून तब्बल १० लाख ६ हजार ५१२ रुपयांची रक्कम उकळण्यात आली. परंतु परदेशात पोहोचल्यानंतर कोणतीही नोकरी न देता त्यांना एका बांधकाम साईटवर डांबून ठेवून जबरदस्तीने काम करायला लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news