Fallow Land Farming: महाडमधील उजाड जमिनींवर फुलणार शेती

गटशेतीच्या माध्यमातून तरुणवर्गाला शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न; शिवसेना शेतकरी संघटना घेणार पुढाकार
Fallow Land Farming
Fallow Land FarmingPudhari
Published on
Updated on

महाड: महाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध असूनही विविध कारणांमुळे अनेक शेतजमिनी पडीक आणि उजाड राहिल्या आहेत. या जमिनींचा शेतीसाठी योग्य वापर होणार आहे. पडीक जमिनी पुन्हा लागवडीखाली आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शिवसेना शेतकरी संघटना पुढाकार घेणार असल्याची माहिती संघटनेचे कोकण उपाध्यक्ष विजय सावंत यांनी दिली.

महाड तालुक्यात भातशेतीसह विविध प्रकारची शेती करण्यास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. मात्र, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, शेतीतील अनिश्चितता, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक पद्धतीमुळे अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात असल्याचे चित्र आहे.

परिणामी अनेक ठिकाणी सुपीक जमीन असूनही ती पडीक राहते. या पार्श्वभूमीवर अशा जमिनींचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

Fallow Land Farming
Shravan Somvar Special: पारमाची वाडीतील समस्त शिवभक्तांचे तारणहार श्री सिद्धेश्वर

यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. एकट्या शेतकऱ्याला शेती करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी अनेक शेतकरी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.

तसेच आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा, सुधारित बियाणे आणि बाजारपेठेचे नियोजन यांचा सामूहिकपणे वापर करणे शक्य होणार आहे. “गटशेतीच्या माध्यमातून तरुण वर्गाला शेतीकडे वळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल,” असे शिवसेना शेतकरी संघटनेचे सचिव अनिल मालुसरे यांनी सांगितले.

शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी गट स्थापन करून आधुनिक पद्धतीने शेती, भाजीपाला, फळबाग, प्रक्रिया उद्योग आणि पूरक व्यवसाय सुरू केल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाड परिसरातील पडीक जमिनींचे सर्वेक्षण करून त्यांचा शेतीसाठी कसा उपयोग करता येईल, याचा अभ्यास करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर, ठिबक व तुषार सिंचनासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब आणि हवामानानुसार योग्य पिकांची निवड यामुळे शेती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Fallow Land Farming
Rajawadi Hospital: राजावाडी रुग्णालयात आरएमओची कमतरता; एका डॉक्टरवर ४०० ते ५०० रुग्णांचा भार

तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित होत असताना त्यांना गावातच रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. गटशेतीच्या माध्यमातून ही गरज काही प्रमाणात पूर्ण करता येऊ शकते.

त्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, प्रशिक्षण आणि बाजारपेठ यांची माहिती उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, या उद्देशाने शिवसेना शेतकरी संघटनेचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

विभागातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून मागील तीन-चार दशकांपासून झालेली औद्योगिक वसाहतीमुळे शेतीकडे झालेले दुर्लक्ष लक्षात घेता पालकमंत्री भरत गोगावले व युवा नेते विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देतानाच यांत्रिकी पद्धतीने सुरू झालेल्या शेती कामाला अधिक गती देण्यात येईल.

- विजय सावंत, उपाध्यक्ष, कोकण विभाग, शिवसेना शेतकरी संघटना

रोहये मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पालकमंत्री भरत गोगावले यांनी रोजगाराची संधी केवळ कंपनी अथवा अन्य ठिकाणी नोकरी करून न करता आपल्या शेतीमधून सोने निर्माण करण्याकडे लक्ष देण्याबाबत केलेल्या सूचनेचे स्वागत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले असून युवा नेते जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या सूचनेनुसार आगामी काळात विभागातील ओसाड जमीन जिरायती करण्याकरता नियोजनबद्ध कार्यक्रमांचे आयोजन विभागनिहाय करण्यात येईल.

- अनिल मालुसरे, सचिव, शिवसेना शेतकरी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news