

अलिबाग : रमेश कांबळे
अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रोहा मार्गावर वढाव ते खानावदरम्यानचा साकव कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
साकवावरून दुचाकीवरून प्रवास करणारा चालक थोडक्यात बचावला, तर दुसऱ्या एका चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक दिवसांपासून साकवाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती, तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले नव्हते.
घटनास्थळी पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाखल झाले असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. साकवाचे अवशेष हटविण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलावरून काही वाहने जात असताना अचानक काँक्रीटचा भाग खचला आणि पुलाचा मधला भाग जमिनीत कोसळला. अपघात घडताच नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, वाहतुकीसाठी दोन्ही बाजू बंद केल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पुलाखाली काही लोक किंवा वाहने अडकल्याची शक्यता नाकारली नसली तरी, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.दरम्यान,या दुर्घटनेने साकवांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.
दुरुस्तीची मागणी
नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. हा पूल गेल्या काही महिन्यांपासून खराब स्थितीत होता आणि त्याची दुरुस्ती वारंवार मागणी करूनही करण्यात आली नव्हती, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या घटनास्थळी वाहतूक वळविण्यात आली असून, संबंधित विभागाकडून तातडीने तपासणी व दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.