

रायगड ः खांदेरी किल्ल््याला गेल्या 11 जुलै 2025 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या सभेत मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या समूहाअंतर्गत जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. मात्र त्याची दखल अद्याप शासकीय पातळीवर घेण्यात आली आहे का नाही असा प्रश्न खांदेऱी किल्ला तथा कान्होजी आंग्रे बेटावर सद्यस्थितीत निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या साम्राज्याकडे पाहील्यावर येथे जाणाऱ्या इतिहासप्रेमी पर्यटकांना पडत आहे. या बाबतची नाराजी इतिहासप्रेमी पर्यटक व्यक्त करित आहेत.
पूर्वी खांदेरी बेट म्हणून ओळखले जाणारे कान्होजी आंग्रे बेट हे मुंबई बंदराच्या दक्षिणेकडील सीमा दर्शविणारे बेट आहे .अलिबागमधील थळ बंदरातून 4.5 किमी, अलिबाग पासून 9.5 किमी) आणि गेटवे ऑफ इंडिया पासून 23 किमी सागरी अंतरावर हा किल्ल्ला आहे. कान्होजी आंग्रे बेट हे कान्होजी आंग्रे यांच्या नौदल शौर्याचे ऐतिहासिक प्रतीक आहे.
शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धभूमी आणि तटबंदी अजूनही शाबूत आहेत आणि जेट्टीपासून दीपगृहापर्यंतच्या उंच, पक्क्या मार्गाने चढताना ते पाहता येतात. लँडिंग जेट्टीच्या उजवीकडे वडाच्या झाडाखाली कोळीबांधवांचे वेताळ देवाचे मंदिर आहे.खांदेरी बेटावरील दीपगृह 1852 अस्तित्वात आले. कान्होजी आंग्रे बेटाची पर्यटन क्षमता वाढवण्यासाठी,
शिपिंग मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय यांनी संयुक्त उपक्रमात हाती घेतले.मुंबई पोर्ट ट्रस्टने त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत कान्होजी आंग्रे बेटाच्या नैसर्गिक वारसा पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 30 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
अशा ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या खांदेरी किल्ल्यावर सद्यस्थितीत थळ आणि गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीने पर्यटक येतात. त्यातील काही पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने या किल्ल्यावर कचऱ्याचे साम्राज्य दिसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर रायगड जिल्हा प्रशासनाने सत्वर उपाययोजना करावी अशी मागणी इतिहास प्रेमींमधून करण्यात येत आहे.