

पनवेल : तळोजा एमआयडीसी येथील हॉटेलमधील बेकायदा वेश्याव्यवसायातुन सात महिलांची मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्वयीन बांगलादेशी मुलगी सह दोन प्रौढ बांगलादेशी महिला व अन्य तीन महिला अशा सात जणींची गुन्हे शाखेतील पोलीसांनी सुटका केली आहे .
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त-गुन्हे दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त-गुन्हे शाखा सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, तळोजा एम.आय.डी.सी. येथील हॉटेल नवनाथ इन या लॉजिंगचा मॅनेजर हा लॉजमध्ये ग्राहकाकडुन दोन हजार रूपये घेवुन लॉजमधील रूममध्ये ठेवलेल्या महिला दाखवुन, त्या महिलांकडुन वेश्या व्यवसाय करून घेत आहे.
वपोनि घोरपडे यांनी त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे बनावट ग्राहकास हॉटेल नवनाथ इन या लॉजिंग मध्ये पाठवले. बनावट ग्राहकाच्या सांकेतीक इशाऱ्यावरून पथकाने लॉजवर छापा टाकला. त्याठिकाणी एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व 6 पिडीत महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या मिळुन आल्या. लॉज मालक वसंत शेटटी, लॉज मॅनेजर गिरीश शेटटी, सर्व्हिस बॉय रोशन यादव यांनी अल्पवयीन मुलीस व पिडीत महिलांना लॉजमध्ये ठेवले होते.
सर्व्हिस बॉय रोशन याने त्यांना बनावट ग्राहकास दाखवुन बनावट ग्राहकाने पसंद केलेल्या महिलेस वेश्यागमनाकरीता पाठवल्याचा मोबादला म्हणुन दोन हजार रूपये बनावट ग्राहकाकडुन स्विकारले. आरोपी वसंत गणेश शेटटी (लॉज मालक ,गिरीश विठठल शेटटी (लॉज मॅनेजर), रोशन रामजित यादव (सर्व्हिस बॉय) यांनी आपसात संगनमत करून अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व 06 महिला पैकी दोन बांगलादेशी पिडीत महिलांना वेश्या व्यवसायाकरीता आणून लॉजचा वेश्याव्यवसायासाठी वापर केला.
या गुन्ह्या प्रकरणी तीघा आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत. ही कारवाई सहा. पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोनिरी पृथ्वीराज घोरपडे, पोहवा मांडोळे, पोशि ठाकुर, पोशि चव्हाण, पोशि पारासुर, पोशि कोलते, पोहवा सविता म्हात्रे, पोहवा मनिषा पावडे, चालक पोहवा हाडे यांनी केली आहे.