

खेड : रायगड जिल्ह्यातील तळा शहराजवळ असलेल्या ऐतिहासिक तळगडावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याला मोठे यश मिळाले आहे. अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन मोहिमा राबवून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हा ऐतिहासिक दरवाजा उघडकीस आणला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली आदिलशहाकडून तळगड जिंकून घेतला होता तर 1659 मध्ये अफजलखानाच्या स्वारीदरम्यान सिद्दीने याच तळगडाला वेढा घातल्याचा उल्लेख आढळतो. तुलनेने लहान आकाराचा आणि दक्षिणोत्तर पसरलेला असलेल्या या किल्ल्यावर गुप्त दरवाजा असल्याची माहिती प्रतिष्ठानला मिळाल्यानंतर या शोधमोहिमेची सुरुवात झाली.
अभ्यासकांकडून गडाची माहिती व नकाशा समजून घेतल्यानंतर प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी फावडे, टिकाव, पहारी यांच्या साहाय्याने उत्खनन सुरू केले. पहिल्या मोहिमेत 1520 सदस्यांनी अर्धा मातीचा ढिगारा उपसून काढला. त्या नंतर दुसऱ्या मोहिमेत तब्बल 4550 सदस्यांनी विशेष मेहनत घेत अखेर हा चोर दरवाजा शोधून काढला. दरवाजा उघडल्यानंतर परिसराची स्वच्छता करण्यात आली. आकर्षक रांगोळी व फुलांच्या हारांनी जागा सजवण्यात आली. या नंतर दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या सदस्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष करून महाराजांना अभिवादन केले. या शोधामुळे तळगडाच्या इतिहासाला नव्याने उजाळा मिळाल्याची भावना अभ्यासक व स्थानिक इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत.