

Raigad Fort Tourism
ईलियास ढोकले
नाते : ऐतिहासिक किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावरील नव्याने तयार करण्यात आलेला घाटरस्ता सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. डोंगरदऱ्यांच्या कुशीतून वळणावळणाने जाणारा हा रस्ता निसर्गरम्य दृश्यांनी नटलेला असून, रायगडकडे येणाऱ्या पर्यटकांना तो अक्षरशः भुरळ घालतो आहे.
स्वातंत्र्योत्तर काळानंतर सत्तरच्या दशकात रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने सध्या अस्तित्वात असलेला रस्त्याच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले होते. कोंझर ते पाचाड या मार्गावर असलेल्या मोठ्या वळणांवर मागील काही वर्षात झालेल्या अपघातांच्या व दुचाकी वाहनांच्या घटनांनंतर 2017 मध्ये किल्ले रायगड मार्गाला राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती घोषित झाल्यावर या मार्गाला पर्यायी मार्ग काढण्याचा निर्णय करण्यात आला यानुसार सध्या नव्याने निर्माण करण्यात आलेला मार्ग हा अधिक सुलभ व पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही येणारे शिवभक्तांसाठी विशेष पसंत होणारा ठरणार आहे.या मार्गावरील नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी तीर्थक्षेत्र व पर्यटन विभागांतर्गत अथवा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून येथे येणाऱ्या पर्यटक शिवभक्तांसाठी विशेष सोय सुविधा उपलब्ध करून दिल्यास या मार्गावर संपूर्ण वर्षभर गेल्या दहा वर्षात वाढलेल्या शिवभक्तांच्या संख्येमध्ये अधिक वाढ होईल असा विश्वास परिसरातील व्यवसाय धारकांकडून व्यक्त होत आहे.
महाड ते रायगड हा प्रवास याआधी थोडासा कष्टदायक मानला जात होता. मात्र, या नवीन घाटरस्त्यामुळे प्रवास केवळ सुलभच झाला नाही, तर तो अधिक आनंददायी बनला आहे. घाटातून दिसणारे हिरवेगार डोंगर, पावसाळ्यात ओघळणारे धबधबे आणि दूरवर दिसणारा रायगड किल्ला हे दृश्य पर्यटकांना मोहून टाकते. अनेक पर्यटक येथे थांबून फोटोसेशन करत असल्याचे दिसते. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, या घाटरस्त्यामुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. हॉटेल, चहा-नाश्त्याच्या गाड्या आणि स्थानिक हस्तकला विक्रीत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून रस्त्याच्या कडेने सुरक्षित रेलिंग, बसण्याची सोय आणि दर्शन बिंदू उभारण्याचे यावे अशी मागणी लोकांमधून जोर धरत आहे.