

Woman Attacked In Roha Dhagadwadi
कोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या धगडवाडी येथे एका महिलेवर अज्ञाताने अचानक पाठीमागून येऊन काठी व धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे धगडवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धगडवाडी येथील रहिवासी असलेल्या संबंधित महिला सकाळी आपल्या घराच्या मागील व्हरांड्यामध्ये नेहमीप्रमाणे भांडी घासण्याचे काम करत होत्या. त्यावेळी परिसरात सामसूम असताना एका अज्ञाताने दबा धरून त्यांच्या घराच्या मागील बाजूने व्हरांड्यात प्रवेश केला. महिला कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत त्याने त्यांच्या मागील बाजूस येऊन थेट त्यांच्या उजव्या कानाच्या भागावर काठीने जोरदार प्रहार केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला सावरण्याआधीच, त्या अज्ञात हल्लेखोराने हातातील इतर कोणत्या तरी धारदार हत्याराने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाच्या मागील बाजूस तसेच हाताच्या बोटांवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
हल्ल्यानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पसार झाला. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. महिलेवर हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, चोरीच्या हेतूने करण्यात आला होता, की इतर कारणाने? असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. या गंभीर प्रकाराबाबत जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा घरात घुसून महिलेवर झालेल्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. हल्लेखोराचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाडिक करत असून पोलीस हल्लेखोराच्या मागावर आहेत.