

Birthplace of Indian Economist C.D. Deshmukh in poor condition
श्रीकृष्ण द.बाळ.
महाड : 1960 च्या दरम्यान भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी मराठी भाषिकांवर जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्या तत्कालिन पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरू यांच्यासमोर लोकसभेत आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणाऱ्या, डॉक्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख (सी.डी. देशमुख) यांचे महाड तालुक्यातील नाते येथील जन्मस्थान अत्यंत दुरावस्थेत असल्याचे चित्र प्रत्यक्ष भेटीदरम्यान निदर्शनास आले. यासंदर्भात नाते ग्रामपंचायत व येथील ग्रामस्थांकडून मागील 25 वर्षापासून एलआयसी व राज्य शासनाकडे या जन्मस्थानाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याबाबत लढा दिला जात असून त्याकडे राज्य शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप नाते ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
महाड तालुक्यातील नाते या तीर्थक्षेत्राच्या गावात 14 जानेवारी 1896 रोजी जन्म झाला. स्वकर्तृत्वावर मुंबई विद्यापीठात जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप प्राप्त करणाऱ्या डॉक्टर सीडी देशमुख यांनी यानंतर केंब्रिज विद्यापीठातून रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र व भूगर्भशास्त्र यातील विषयांमध्ये 1915 मध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्यांची पदवी पूर्ण केली 1918 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी आयसीएस परीक्षेत पहिला येण्याचा बहुमान डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी पटकाविला.
यानंतर देशात सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांची भेट घेऊन त्यांनी शासकीय नोकरी न करता देश कार्य करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मात्र लोकमान्य टिळक यांनी त्यांना या नोकरीचा अनुभव स्वराज्याच्या कामी येईल असे सांगितल्याने लोकमान्याची आज्ञा मानून डॉक्टर चिंतामणराव यांनी शासकीय नोकरी करावयाचे ठरवले. तत्कालीन मध्य प्रांतांमध्ये महसूल सचिव वित्त सचिव अशी पदे त्यांनी भूषविली या पदांवर काम करणारे ते सर्वात तरुण आयसीएस अधिकारी होते. सुमारे 21 वर्षे शासकीय नोकरी केल्यानंतर 1931 मध्ये महात्मा गांधी बरोबर गोलमेज परिषदेला त्यांचे सचिव म्हणून उपस्थित राहिल्याची माहिती प्राप्त झाली 1941 मध्ये रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर व 11 ऑगस्ट 1943 रोजी बँकेचे तत्कालिन गव्हर्नर जेम्स टेलरच्या मृत्यूनंतर रिझर्व बँकेचे सर्वात तरुण व पहिले भारतीय गव्हर्नर बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे चटके सर्व जगाला बसत असताना या अर्थतज्ज्ञांनी योग्य उपाययोजना करून अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल 21 मार्च 1944 रोजी ब्रिटिश शासनाने त्यांना सर ही पदवी देऊन सन्मानित केले. बँकेच्या नोकरीत असतानाच भारतीय स्वातंत्र्याच्या संकल्पन काळात त्यांनी व्हॉइस रॉयल कौन्सिलवर वित्त प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली 1949 मध्ये बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला व इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा प्रदर्शित केली.
मात्र तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीमुळे डॉक्टर चिंतामणराव यांनी रिझर्व बँकेची धुरा पुन्हा सांभाळली 1952 झाली डॉक्टर चिंतामणराव तत्कालीन कुलाबा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्या पक्षात झालेल्या भाषावर प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून पंडित नेहरू यांची भूमिका मराठी भाषिकांवर अन्यायकारक असल्याचे मत प्रदर्शित करून नाराज होऊन डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी हैदराबाद येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला २ ऑक्टोबर 1982 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.
मागील अनेक वर्षांपासून नाते ग्रामस्थ डॉक्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांची जयंती व पुण्यतिथी स्थानिक पातळीवर विविध उपक्रमातून साजरी करत आहेत सद्यस्थितीमध्ये तरुण पिढीची गरज म्हणून डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने स्पर्धा परीक्षांचे केंद्र नाते येथे सुरू करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
नाते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाते ग्रामस्थांनी डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचे असलेले जन्मस्थान शासनाने संग्रहित करून ज्या ठिकाणी त्यांच्या नावाने भव्य स्मारक उभारावे यासाठी 25 वर्ष सातत्याने शासनाकडे मागणी देऊन लढा सुरू आहे. आगामी काळात यासंदर्भात शासनाकडे विविध मान्यवरांच्या मदतीतून हे स्मारक लवकर व्हावे म्हणून नाते ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत
सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी गणेश खातू!
कुटुंबीय डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचे जन्मस्थान शासनाकडे संपूर्ण हस्तांतरित करण्यासाठी तयार आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वर्षातून एकदा महागावकर कुटुंबीयांना आल्यावर या स्मारकाच्याच परिसरात महागावकर कुटुंबीयांसाठी वास्तूची निर्मिती करावी ज्याचा उपयोग गावामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमातंर्गत घेणाऱ्या मान्यवरांसाठी होऊ शकेल अशी मागणी असल्याचे नमूद केले.
अविनाश पाथरे महागावकर कुटुंबीयांचे स्नेही
या निमित्ताने नाते ग्रामस्थांमधून केवळ देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करणाऱ्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या या जन्मस्थानाकडे एलआयसी अथवा राज्य शासनाने एक स्वतंत्र विषय म्हणून पाहून महाराष्ट्र राज्याच्या स्थापने करता त्यांनी दिलेल्या योगदानाचे औचित्य साधून भव्य स्मारकाची निर्मिती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी नाते ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.