

खाडीपट्टा : महाड तालुक्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर चिंभावे ग्रुप ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या चिंभावे धनगरवाडी येथील मतदार यादी मध्ये 56 मतदार असलेल्या सर्व मतदारांनी आपल्या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यानंतरच आम्ही मतदानाचा हक्क बजावू तो पर्यंत आमचा मतदानासाठी बहिष्कार असेल अशी भूमिका घेतल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये एकही तेथील मतदारांनी मतदान केलेले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चिंभावे एसटी स्टँड पासून धनगरवाडी गाव साधारण सहा ते सात किलोमीटर अंतराचे आहे. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या दुर्गम गावात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. वारंवार यासाठी पाठपुरावा केलेली असताना देखील आजपर्यंत ही जाणवणारी रस्त्याची मूलभूत गरज न सुटलेमुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे नमूद केले.
येथील नागरिकांसह, शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज पाच ते सात किलोमीटरची पायपीट डोंगर उतारुन करावी लागत असून, मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांनाही दळणवळणाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. आजारी रुग्णाला दवाखान्यात न्यावे लागले तर डोलीच्या सहाय्याने चढ-उतार करावा लागतो, अशी विदारक परिस्थिती नागरिकांनी कथन केली.
निवडणूक आली की नेते गावात येतात, विकासाची भाषा करतात, पण निवडणूक संपली की परिस्थिती जैसे थे च राहते, असे ग्रामस्थांनी महाड तहसीलदार महेश शितोळे यांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी दिलेल्या लेखी पत्राच्या निवेदनात म्हटले आहे.
शनिवारी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांनी घरी भेटी दिल्या असता आम्ही त्यांना स्पष्ट आमचा रस्ता झाल्याशिवाय आम्ही निवडणुकीचा हक्क बजावणार नसल्याचे सांगितले. आधी रस्ता करा मगच आम्ही मतदान करू अशी आम्ही स्पष्ट भूमिका घेतली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
आम्ही मागणी केलेल्या आमच्या मूलभूत गरजा मधील मुख्य रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत येणाऱ्या पुढील सर्व निवडणुकींवर आमचा बहिष्कार राहील.
मंगेश गोरे, ग्रामस्थ
‘आमच्या गावात एकूण 56 मतदार असून, आजपर्यंत ते वेळेत मतदान करत आले आहेत. तरीही आमच्या मूलभूत प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आम्ही सर्व ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्काराचा इशारा टाकला आहे.
नामदेव ढेबे, मतदार