

प्रसाद पाटील
उरण: सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असून, एकेकाळी मैदानांवर गजबजलेली मुलांची गर्दी आता मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवताना दिसत आहे. घराघरांमध्ये बच्चे कंपनी मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आधुनिक साधनांचा वापर वाढला असला तरी त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल व्यसनाची समस्या गंभीर बनत चालली आहे.
पूर्वीच्या काळात सुट्टी लागली की मुलं दप्तर घरात टाकून थेट मैदानाकडे धाव घेत असत. दिवसभर खो-खो, कबड्डी, क्रिकेट, लपंडाव यांसारखे मैदानी खेळ खेळत, तसेच नदी, ओढे, विहिरींमध्ये पोहण्याचा आनंद घेत असत. या खेळांमुळे मुलांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहायचे. मात्र आजच्या परिस्थितीत हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे.
मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्स यांच्या आकर्षणामुळे मुलांचा कल घरात बसून स्क्रीनसमोर वेळ घालवण्याकडे वाढत आहे. विशेष म्हणजे वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी खेळण्यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध नसल्याचेही वास्तव आहे. इमारती, रस्ते आणि इतर बांधकामांमुळे मैदानांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, काही ठिकाणी मुलांना कृत्रिम टर्फवर पैसे देऊन क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची वेळ येत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी मैदानी खेळांची संधी आणखी मर्यादित होत चालली आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे आजार, झोपेचे विकार, चिडचिडेपणा तसेच एकाग्रतेचा अभाव अशा समस्या वाढताना दिसत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि सर्वांगीण विकासावर होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, लहान वयातच मोबाईलचे व्यसन लागल्यास भविष्यात गंभीर मानसिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात.या पार्श्वभूमीवर शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने मुलांसाठी खेळाची मैदाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळांनीही विद्यार्थ्यांना मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध क्रीडा उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
पालकांनीही आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर मर्यादा घालून त्यांना मैदानी खेळांकडे वळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर मोबाईलच्या आहारी जाण्याऐवजी पुन्हा एकदा मैदानांची गजबज वाढवणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
महाडमध्ये मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये “पुस्तक बाग“ हा उपक्रम आम्ही राबवत असून त्यामध्ये मुलांना पर्यावरणासंदर्भात माहिती, मैदानी खेळ, वाचन, कविता अशा अनेक गोष्टींची आवड निर्माण करवण्याचे काम करीत आहोत विविध भागात अशा पद्धतीचे मुलांसाठी कॅम्प घेणे काळाची गरज आहे.
- सुधीर शेठ, संचालक - रंगसुगंधा संस्था