

पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वरई गावाच्या हद्दीतील वांद्री नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून येत्या चोवीस तासात पुलावरून वाहतूक सुरु केली जाणार आहे. पुलावरून वाहतूक सुरु होणार असल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर दहा किलोमीटर अंतरा पर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांची गैरसोय निर्माण झाली होती.
मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामा दरम्यान पालघर तालुक्यातील वरई गावाच्या हद्दीतील वांद्री नदीवर महामार्गाच्या मुंबई वहिनीवर पुलाची उभारणी करण्यात आली होती.जुना पूल गुजरात वहिनीसाठी तर नवीन पूल मुंबई वहिनीवरील वाहनांच्या रहदारीसाठी वापरला जात होता.
दरम्यान सहापदरीकरणाच्या कामात गुजरात वहिनीवर तीन मार्गीका असलेला नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर चाळीस वर्षे जुन्या पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली, तसेच गुजरात मार्गीकेवरील वाहतूक नवीन पुलावरून सुरु करण्यात आली होती.
सातिवली ते वरई दरम्यानचा परिसर सातिवली उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरला होता. पावसाळ्यात वांद्री नदीवर महामार्गाच्या मुंबई वहिनीवर पुलाच्या पृष्ठभागावर पाणी साठून मोठमोठे खड्डे पडले होते.
अवजड वाहतूक सुरु असल्यामुळे पुलाचा पेडस्ट्रल स्टोन फुटल्याने पूल वाहतूकीसाठी धोकादायक झाला होता. धोकादायक परिस्थितीत पुलावरून अवजड वाहतूक सुरु असल्यामुळे पुलावर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी पुलाच्या फुटलेल्या पेडेस्टल स्टोनच्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून पुलाची पाहणी करण्यात आल्यानंतर फुटलेला पेडस्ट्रल स्टोन तसेच पुलाच्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते.कार्यादेश मिळाल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस ठेकेदाराकडून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते.महिना भरात दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
येत्या चोवीस तासांनी दुरुस्ती केलेल्या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरु केली जाणार आहे. सातिवली उड्डाणपुलाच्या कामामुळे सलग सहा महिने कोंडी सहन करावी लागली होती, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटली होती.
परंतु अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा वरई गावाच्या हद्दीतील वांद्री नदी पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडीचा त्रास सुरु झाला होता.महिना भरात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वीस ट्रॅफिक वार्डन तसेच महामार्ग सुरक्षा विभागाकडून दहा अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.