

म्हसळा: रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असला तरी येथील मुळ व्यवसाय हा शेतीच आहे.यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर लागणारी सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासन महिला, बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा येथे दिले.
म्हसळा येथे सुरू करण्यातआलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाला जि.प. उपाध्यक्ष मधुकर पाटील,जि.प. कृषी व पशु संवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह जि.प.पं.स.पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शेतीला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जोपासणाऱ्या शेतकऱ्यांचे आपल्या जनावरांवरील प्रेम अनमोल असते .शेतकरी आपल्या पाळीव जनावरांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जीव लावत असतो याचे प्रत्यक्षात अनुभव मला पोलादपूर येथे मागील चक्री वादळ दरम्यान झालेल्या दुर्घटनेत आलेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही तसेच त्यांना योग्य उपचार व मदत मिळेल याची खबरदारी पशु विभागातील सर्व डॉक्टर व कर्मचारी यांनी घेतली पाहिजे अशा सूचना तटकरे यांनी दिल्या. त्याचबरोबर जनावरांना लागणारी औषधे देऊन त्यांचे नियमित लसीकरण करून घ्यावे. कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना नवनवीन योजनांची माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही केली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी म्हसळा तालुक्यातील शेतकरी वर्गाला भरभरून मदत केली जाईल असे सांगून शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्वच योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हाहन केले. कृषी व पशु संवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती सांगून शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी म्हसळा तालुक्याला झुकते माप दिले जाईल असे सांगितले.
तसेच पंचायत समिती सभापती व सदस्यांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या विभागात शिबिरे, मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी दुवा म्हणून काम करावे असे सुचित केले. पंचायत समिती सभापती बबन मनवे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय जिल्हा उप आयुक्त सचिन देशपांडे यांनी केले तर पंचायत समिती चे सदस्य लहू म्हात्रे यांनी आभार मानले. उदघाटन सोहळ्याला सभापती बबन मनवे, समीर बनकर, जि.प. सदस्य अनिल बसवत, अभिषेक विचारे, पं.स. सदस्य लहू म्हात्रे, प्रियांका निंबरे समृद्धी चाचले, जिल्हा उप आयुक्त सचिन देशपांडे, प्रांत महेश पाटील, तहसीलदार सचिन खाडे, बीडीओ माधव जाधव, दामोदर दिघीकर, उपस्थित होते.
विरोधी पक्ष नसलेली एकमेव जिल्हा परिषद
देशाच्या आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती आहे. यातूनच रायगड जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेतील तीनही पक्षांनी एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली आहे.
विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षाचे देखील निवडून आलेल्या जिप सदस्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबा दिला असल्याने रायगड जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष नाही यावरून देशात आणि राज्यात विरोधी पक्ष नसलेली रायगड जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद आहे असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले.