माणगाव : माणगाव बाजारपेठेत पिसोरी हरीण आढळले. हे हरीण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बुधवारी (दि.२६) सकाळी हरीण कृष्णा गांधी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांना दूरध्वनीवरून यासंबंधी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी ढगे हे तात्काळ आपले सहकारी वनरक्षक वैशाली भोर, अनिल मोरे आणि वाहन चालक विवेक जाधव यांच्यासोबत बचावासाठी पोहोचले. (Chevrotain)
त्यांनी तत्काळ हरिणाला पिंजऱ्यात सुरक्षित ठेऊन लगेच माणगांव पशुवैद्यकीय दवाखान्यात चाचणीसाठी नेले. पिसोरी हरीण संपूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करून वनविभागामार्फत योग्य त्या नोंदी व काळजी घेत मादी पिसोरी हरीणास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. (Chevrotain)
सदरचे बचावकार्य रोहा उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांवचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिदुद्ध ढगे, वनरक्षक अनिल मोरे आणि वैशाली भोर, वाहन चालक विवेक जाधव, व स्थानिकांच्या मदतीने करण्यात आले.
मूषक हरीण म्हणजेच पिसोरी हरीण हा अतिशय दुर्मिळ लाजरा व मनुष्यवस्तीपासून राहणारा वन्यजीव आहे. वेळप्रसंगी खूप चपळतेने हे हरीण पळते. एका अतिदुर्मिळ अश्या हरीणाचे प्राण वाचवून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. सद्याच्या
पूरपरिस्थितीमुळेच वन्यजीवांची देखील वाताहत होत आहे. भर वस्त्यांमधून त्यांचा वावर आढळून येतोय. माणगांव शहरातल्या मगरीच्या बचावानंतर आता लगेचच हे पिसोरी हरीण बाजारपेठेत आढळले. स्थानिक नागरिकांनी अश्या प्रकारे वनविभागाला त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पुन्हा एकदा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांनी यावेळी केले.
हेही वाचा;