रायगड: रोहा येथे १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

रायगड: रोहा येथे १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल

महादेव सरसंबे

रोहा: जमिनीची फेरफार नोंद करून उतारा देण्यासाठी १० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठ्यावर आज (दि.२६) गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष मनोहर चांदोरकर (वय 43, सजा भालगाव, ता. रोहा, जि. रायगड) रा. बेंड्रा कॉम्पलेक्स, सी २०२ बायपास रोड, रोहा) असे तलाठ्याचे नाव आहे. ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जमिनीची फेरफार नोंद करून उतारा देण्यासाठी तलाठी संतोष चांदोरकर यांनी तक्रारदाराकडे दि. ३० मे २०२३ रोजी १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चांदोरकर यांच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याआधीही तलाठी चांदोरकर यांच्यावर महाड येथे दोन वेळा कारवाई करण्यात आली होती.

ही कारवाई एसीबी, ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, एसीबी, ठाणे परिक्षेत्र अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, रुण करकरे, विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, पोलीस हवालदार जितेंद्र पाटील, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांनी सापळा रचून कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे करीत आहेत.

Back to top button