

महाड : पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिवर्षीप्रमाणे ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी तिथीनुसार ३४९ वा राज्याभिषेक दिन सोहळा आज (दि.१२) किल्ले रायगडावर मोठया उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. कोकणकडा मित्रमंडळ महाड, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा झाला.
यावर्षी राज्याभिषेक सोहळयासाठी शिवभक्तांच्या हजेरीने किल्ले रायगड घोषणाच्या आवाजाने दुमदुमून गेला. हा प्रेरणादायी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. होळीचा माळ, बाजारपेठ राजदरबार शिवभक्तांनी फुलून गेला होता. सकाळी ध्वजपूजनाने सोहळयाला सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी राजसदरेकडे निघाली. यावेळी शिवाजी महाराजांचा जयजयकार आणि ढोलताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला होता. हजारो शिवभक्त हातात भगवे झेंडे घेवून नाचत होते. होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पहायला मिळाली. तर रात्री राजदरबारात जगदंबेचा जागर गोंधळ, शाहिरी पोवाडयांचा कार्यक्रम रंगला होता.
या वर्षी शनिवार (दि.११) पासून दोन दिवस हा सोहळा भव्य दिव्य असा साजरा करण्यात आला. यावेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रूपेश म्हात्रे आदीसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर मुख्य पालखी सोहळयाला प्रारंभ झाला.
पुढील वर्षी होणारा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शासनामार्फत सर्व चोख व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, पुढील वर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी यावर्षीच्या दहापट संख्येने आपण किल्ले रायगडावर यावे. ३५० वर्षांपूर्वी झालेल्या सोहळ्याचे स्मरण पुढील वर्षी न भुतो न भविष्यती अशा स्वरुपात लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये केले जाईल. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या घोषामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळयाला मंत्रोच्चारांच्या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्रीजगदीश्वराचे दर्शन घेवून या चैतन्यमय सोहळयाची सांगता झाली.
या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सुमारे २०० घोष दलाच्या स्वयंसेवकांनी सकाळी राजदरबारात व त्यानंतर सुमारे वीस मिनिटे होळीच्या माळावर छत्रपती शिवाजी महाराजांना देशभक्तीपर व शिवभक्तीवर गीतांनी मानवंदना दिली. गेल्या काही वर्षांपासून बजरंग दल विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातून अनेक ठिकाणांहून शिवभक्त मोठय़ा संख्येने या राज्याभिषेक सोहळ्या करीता येत आहेत.
हेही वाचलंत का ?