

नेरळ : आनंद सकपाळ
रात्रीचा घनदाट अंधार, मोबाईलचा अपूरा उजेड आणि चिखल-दगडांनी भरलेली निसरडी पायवाट... अशा अत्यंत बिकट परिस्थितीत एका कॅन्सरग्रस्त महिलेला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली धडपड प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे शेवटी अपूर्णच राहिली. रस्ता आणि वाहतुकीची कोणतीही सुविधा नसल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात नेणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. इतकेच नव्हे, तर मृत्यूनंतरही तिचा मृतदेह खांद्यावरून त्याच खडतर वाटेने परत घरी आणावा लागला.
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जुम्मापट्टी परिसरातील या ऱ्हदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांचा आणि रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास असलवाडी येथील रहिवासी भिमा गोमा सांबरी (वय ५०) यांची अचानक प्रकृती बिघडली. त्या कॅन्सरग्रस्त असल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. मात्र, वाडीपर्यंत कोणतेही वाहन पोहोचू शकेल असा रस्ताच उपलब्ध नाही.
अखेर वेळ न दवडता कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी कापडी झोळी तयार केली आणि भिमा सांबरी यांना त्यात घालून उपचारासाठी पायपीट सुरू केली. मोबाईलच्या उजेडात चिखल-दगडांची पायवाट तुडवत ग्रामस्थ असलवाडी येथून जुम्मापट्टीच्या दिशेने निघाले; परंतु वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच वाटेत भिमा सांबरी यांची प्राणज्योत मालवली. ज्या झोळीतून जीव वाचवण्यासाठी प्रवास सुरू झाला होता, त्याच झोळीतून सांबरी यांचा मृतदेह खांद्यावरून परत घरी आणावा लागला.
भिमा सांबरी यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही मूलभूत हक्कांच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी बांधवांच्या वास्तव परिस्थितीवर मारलेली सणसणीत चपराक आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जुम्मापट्टी परिसरातील रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांची आहे.
१२ आदिवासी वाड्यांचे मरणयातनांचे जिणे
जुम्मापट्टी परिसरातील असलवाडी, बेकरेवाडी, धनगरवाडा यांसारख्या माथेरानच्या डोंगराळ भागात वसलेल्या सुमारे १२ आदिवासी वाड्यांमध्ये रस्त्याची अत्यंत भीषण समस्या आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. पावसाळ्यात तर या भागातील परिस्थिती अधिकच बिकट होते. चिखलमय व घसरड्या रस्त्यांमुळे आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्धांना रुग्णालयात पोहोचवणे म्हणजे मृत्यूशी झुंज देण्यासारखेच ठरते.
प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश
आम्ही रस्त्यासाठी अनेकदा आंदोलने केली, रास्ता रोको केला. मात्र, प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासनेच मिळाली; प्रत्यक्षात एकही काम मार्गी लागले नाही. प्रशासनाच्या या हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळेच आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे, असा तीव्र संताप लक्ष्मण सांबरी, देऊ सांबरी , पांडू सांबरी, रमेश सांबरी आणि आदिवासी संघटनेचे पदाधिकारी गणेश पारधी यांनी व्यक्त केला आहे.