

ठाणे : घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत २६ वर्षीय फिजिओथेरपिस्ट तरुणीचा मृत्यू झाला. तिच्यासोबत दुचाकीवर असलेली आई जखमी झाली. अपघातानंतर कंटेनरचालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हर्षिता शिवा गौडा (२६) असे मृत तरुणीचे नाव असून त्यांची आई नंदिनी शिवा गौडा (४७) जखमी झाल्या आहेत. ७ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गायमुख येथील वेंकीज हॉटेलसमोरील रस्त्यावर हर्षिता होंडा अॅक्टिव्हावरून आईसह जात होत्या. त्यावेळी कंटेनर क्रमांक एमएच ४६ सीएल ६८४३ वरील चालक इमरान कय्युम खान (५१, रा. भिवंडी) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
धडकेनंतर हर्षिता कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर नंदिनी जखमी झाल्या. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केले. कासारवडवली पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.