

अलिबाग : रायगडच्या खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जण हे पोहोत समुद्र किनारी आल्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे. तर उर्वरित तिघांचा शोध सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातून मोठी दुर्दैवी घटना समोर येत आहे. खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही बोट आज सकाळी सात वाजेपासून समुद्रात मासेमारीसाठी गेली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. बोटीत एकूण 8 जण होते. बोट समुद्रात असताना ओहटीच्या लाटांमुळे उलटल्याची घटना घडली. या घटनेनंतर 5 जण बचावले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर 3 जणांचा शोध अद्याप सुरु आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरु आहे. पण मुसळधार पावसामुळे शोध मोहीमेत अडथळा येत असल्याची देखील माहिती आहे.राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे समुद्राला देखील उधाण आलं आहे. त्याचाच फटका रायगडमध्ये बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची बोट करंजा येथून सकाळी सात वाजता निघाली होती. बाहेर आलेल्या रोशन कोळी या तरुणाच्या डोक्याला जबर मार बसला. तर इतर जण किरकोळ जखमी आहेत. त्यांना अलिबागच्या सिविल हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेलं आहे. तर ड्रोनच्या मदतीने किनाऱ्याजवळ बाकी व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
1) हेमंत बळीराम गावंड , वय - 45 रा.आवरे ता. उरण
2) संदीप तुकाराम कोळी , वय - 38 रा. करंजा ता . उरण
3) रोशन भगवान कोळी वय - 39 रा. करंजा ता. उरण
4) शंकर हिरा भोईर वय - 64 रा. आपटा ता . पनवेल
5) कृष्णा राम भोईर वय - 55 रा. आपटा ता . पनवेल
1) नरेश राम शेलार
2) धीरज कोळी रा. कासवला पाडा उरण
3) मुकेश यशवंत पाटील